जुलियन असांज बलात्काराच्या आरोपातून मुक्त

सामना ऑनलाईन । लंडन

जगभरात खळबळ माजवणाऱ्या विकिलीक्सचे संस्थापक जुलियन असांज यांना बलात्काराच्या आरोपातून मुक्त करण्यात आलं आहे. स्वीडनच्या न्यायालयाने आज यासंदर्भातील घोषणा केली आहे. अमेरिकेची सरकारी हेरगिरी उघड करून विकिलीक्स ही संस्था आणि असांज चर्चेत आले होते. स्वीडनच्या पब्लिक प्रॉसेक्युशनच्या संचालक मॅरिएन नी यांनी असांज यांच्या विरुद्ध लावलेले बलात्काराचे आरोप आणि त्याबाबतची चौकशी बंद करत असल्याचे शुक्रवारी जाहीर केले.

अमेरिकेने आपल्या नागरिकांसह जगभरातील नेत्यांचे (मित्र राष्ट्रांचे सुद्धा) टेलिफोन संभाषण, ईमेल व्यवहार यांची हेरगिरी केली असा धक्कादायक खुलासा जुलियन असांज यांनी विकिलीक्सच्या माध्यमातून केला. अमेरिकेने त्यांच्या विरुद्ध अटक वॉरंट बजावलं होतं. ४५ वर्षीय असांज २०१२ पासून लंडन येथील इक्वाडोरच्या दूतावासात शरण घेऊन आहेत. त्यांचं अमेरिकेत प्रत्यार्पण करण्यासाठी प्रयत्न सुरू असतानाच त्यांच्यावर बलात्काराचा आरोप लावण्यात आला होता. असांज आणि त्यांच्या वकिलांनी हा एक षडयंत्र असल्याचा दावा केला होता.

एमकेकांना घनिष्ठ मित्र मानणाऱ्या अमेरिका आणि ब्रिटनमध्ये कैद्यांची देव-घेव आणि प्रत्यार्पण कठिण नाही. मात्र, अमेरिका आणि इक्वाडोरमध्ये प्रत्यार्पण करार सहज नसल्याने असांज यांनी लंडन येथील इक्वाडोरच्या दूतावासात शरण मागितली. इक्वाडोरने सहकार्य करून ही विनंती मान्यदेखील केली.