रानमेवा

59

स्वप्नील साळसकर, [email protected]

परीक्षा संपल्या आणि चाकरमानी आपल्या कुटुंबकबिल्यासह मुलखाकडे सरकू लागले आहेत. गावी जाणे म्हणजे मौज, मजा, मस्ती आणि आंबा, काजू, फणसावर ताव इतकेच नव्हे तर रानावनात भटकून, रानमेव्याचा आस्वाद घ्यायचा हा लहानग्यांचा मग रोजचाच दिनक्रम. पण रानमेव्यातील करवंदाव्यतिरिक्तही जंगलात अशी काही फळे आहेत की त्याची माहितीही अजून बऱयाच जणांना नाही. निसर्गानेच त्या-त्या ऋतूमध्ये दिलेली ही एक मेजवानीच असते. कोकणातील हा रानमेवा कोणता आहे हे जाणून घेऊया.

हसोळी साधारण जानेवारी महिन्यात हसोळी नावाचे हे काळय़ा रंगाचे गोड फळ चाखायची संधी मिळू शकते. शेतकरी आपली गुरे चरवण्यासाठी रानावनात भटकत असताना त्यावेळी त्यांचे हे खाद्य असायचे. शिवाय हे सुवासिक फळ असून रसाळ आहे. हसोळय़ावरील टरफल फक्त खाल्ले जाते कारण आतील बी नारळाच्या किशीप्रमाणे असते.

चारोळी कोकणात चारोळी म्हणजे चाराबोरा या नावाने प्रसिद्ध आहे. चारोळी म्हटल्यावर आपल्या समोर येते पिवळसर रंगाची छोटीशी बी. तिचा वापर शिरा, खीर किंवा इतर पदार्थांमध्येही केला जातो. आजच्या घडीला साधारण ४५० रुपये १०० ग्रॅम इतक्या महागडय़ा दराने तिची विक्री होते. पण त्याही पलीकडे चाराबोरा या नावाप्रमाणे काळय़ा रंगाचा हा रानमेवा तितकाच स्वादिष्ट आणि रुचकर असतो. जेवढा खाल तितकाच खावासा वाटतो, अशी ही बोर असतात.

तोरणा वेलीसारखे अत्यंत काटेरी असणाऱया या झाडावर पांढऱया रंगाची फळे जिभेचा आस्वाद पूर्ण करणारी आहेत. साधारण मार्चपासून मे या तीन महिन्याच्या कालावधीत ती

या काटेरी वेलीवर फळे तयार होण्यास सुरुवात होते.

आटका यालाच रानबोर असे म्हटले जाते. चविष्ट असे फळाचे झाड मात्र आकाराने मोठे असते. फाद्यांना लहान लहान काटे असले तरी हे टपोरी रानबोर मधुर असून त्यामध्ये चार-पाच छोटय़ा बिया असतात. मात्र कालौघात ही झाडे फारच दुर्मिळ झाली आहेत.

चिकना अत्यंत लहान आणि काळय़ा रंगाचे हे फळ साधारण मार्च महिन्यात तयार होण्यास सुरुवात होते. फळ पिकल्यानंतर अगदी कमी अवधीतच ते संपून जाते. डाळीच्या आकाराच्या दोन बिया त्यामध्ये असून पूर्ण पिकलेले हे फळ रुचकर लागते.

आमटा लहान लहान काटेरी झुडपांमध्ये मिळणारी ही आंबट गोड फळे आहेत. शेताच्या बांधावर अशी झुडपे पूर्वी मोठय़ा प्रमाणात होती. आंबटगोड लागणारे आणि एकच बी असणारे हे फळ जिभेवर ठेवले तरी विरघळते.

भेडशी (जांभूळ) – हेही जांभूळच, परंतू अत्यंत लहान आकाराचे. साधारण एप्रिलच्या शेवटच्या आठवडय़ापासून ही भेडशी पिकण्यास सुरुवात होतात. प्रचंड घोसाने लागणारी ही फळे थोडीशी चवीने वेगळी लागतात.

आवळधोडा फेब्रुवारी ते मार्च या महिन्याभराच्या कालावधीत ओवळाची फुले जी अत्यंत सुगंधित आहेत. पूर्वी गावातील महिला त्याचे गजरेही बनवत होते. फुलांचा  कालावधी संपला की आवळधोडा तयार होतो. लालभडक रंगाचे हे छोटेसे फळ ज्यामध्ये चिकूप्रमाणे एक किंवा दोनच बिया आढळतात.

जांभूळहे सर्वांच्या परिचयाचे आणि औषधी गुणधर्म असणाऱया रानमेव्यातील या फळावर मात्र मोठय़ा प्रमाणात सध्या प्रक्रिया केली जात असून लागवडीवरही भर दिला जात आहे. मधुमेहासाठी जांभूळ पावडर, जांभूळ रस, उपयुक्त मानला जातो.

रानआवळा रानआवळय़ाची झाडे कोकणात घराच्या आजूबाजूला भातशेतीच्या परिसरात पहायला मिळतात. खूप लहान आकाराचा हा आवळा अत्यंत तुरट असतो. पाचक पदार्थ म्हणून त्याची पावडर, आवळा मावा, आवळा सरबत यासारखे पदार्थ तयार केले जातात. रोगप्रतिकारशक्तीसाठी आवळा उपयुक्त मानला जातो.

बोर वेंगुर्ले, मालवण, देवगड समुद्रकिनारपट्टीवर लहान आकाराच्या झुडपांमध्ये ही बोर पहावयास मिळतात. येथील स्थानिक रहिवाशी बाजारपेठांमध्ये आणून त्याची विक्रीही करतात. विद्यार्थ्यांसाठी बोर हा सर्वांत आवडीचा विषय आहे. साधारण मार्चपासून पुढे दोन महिने मोठय़ा प्रमाणात बोर खाण्याची संधी असते.

करवंद हा रानमेवा सर्वांनाच माहीत आहे. शहराला लागून असलेल्या ग्रामीण भागातून सध्या करवंद मोठय़ा प्रमाणात बाजारात दाखल झाली आहेत. पानांचे द्रोण तयार करून १५ ते २० रुपये दराने सध्या त्याची विक्री सुरू आहे. करवंदामध्ये दोन प्रकार आहेत. लहान आणि मोठी करवंद. त्याचा आतील रंगही वेगवेगळा असतो.

चिंच चिंच म्हटल्यावर सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटते. चिंच ऑक्टोबर ते डिसेंबर महिन्यात लागण्यास सुरुवात होते आणि फेब्रुवारी मार्च महिन्याच्या कालावधीत पिकण्याचा कालावधी असतो. स्वयंपाकघरात तिचा मोठय़ा प्रमाणात वापर होतो. चिंचेच्या बिया (चिंचुके) पूर्वी भाजून किंवा पाण्यात उकडून खाण्याची पद्धत होती.

बेसुमार होणारी जंगलतोड यामुळे कोकणात नामशेष होणारा हा निर्सगाचा अनमोल ठेवा संवर्धन होण्याची गरज आहे. शेतशिवार, रानावनातील ही दुर्मिळ झाडे वाचवण्यासाठी सर्वांनीच पुढाकार घेणे महत्त्वाचे ठरणार आहे.