मन मुक्त

विद्या कुलकर्णी, वन्यजीव अभ्यासक

आपल्यापैकी बऱयाचजणांच्या घरात, घराभोवती राघू, चिमण्या खारी यांचे अगदी सहज वास्तव्य असते. महाराष्ट्रातही अशी केवळ प्राण्यांच्या, पक्ष्यांच्या मुक्त संचाराने सजलेली ठिकाणं आहेत.

द्विध प्रकारची वनक्षेत्रे ही महाराष्ट्राचा प्राणवायू आहेत. त्या वनक्षेत्रातील प्राणीसृष्टी हे रांगडय़ा, राकट महाराष्ट्राचे देखणे सौंदर्य आहे. मानवनिर्मित वनक्षेत्रे आपण नेहमीच पाहतो पण अजूनही महाराष्ट्रात आणि अगदी शहरी भागांतही अशी अनेक क्षेत्रे आहेत जेथे वन्य प्राणी मुक्त संचार करतात. कोणत्या न कोणत्या प्रलोभनाने तेथे ओढले जातात आणि माणसेही बऱयापैकी शहाण्यासारखी वागून त्या प्राण्यांना, पक्ष्यांना तेथे मनःपूत बागडू देतात.

वन्य जीवन मुबलक वृद्धिंगत  होण्यासाठी  तेथील भौगोलिक परिस्थिती फार महत्त्वाची असते. पशू व पक्षी यांना दाट झाडी, भरपूर प्रमाणात पाणी व पोषक वातावरण असावे लागते. पक्ष्यांना त्यांचे खाद्य मिळेल व घरटी बांधता येतील अशी फळांची झाडे लागतात. पाणथळ जागा असल्यास पक्ष्यांना किडे, मासे, पानवेली भरपूर प्रमाणात उपलब्ध असावी लागतात.

नाशिकहून साधारण १०४ कि.मी. अंतरावर येवला येथे राजापूर जंगलामध्ये हरीण व काळवीट आढळतात. त्यांची सध्या संख्याही वाढलेली आहे. साधारण ४५०० हेक्टरचा हा जंगलाचा पट्टा, त्यात ममदापूर, देवदारी, खारवाडी, सोमठाणे ही गावे येतात. विजेची कमतरता असल्यामुळे सौरऊर्जेवर चालणाऱया पाण्याच्या टाक्या बसवल्या. त्यामुळेच त्यांच्या संख्येमध्ये वाढ झाली. कोयना, राधानगरीमध्येसुद्धा वन्य जीवन पाहायला मिळते. कोयना वन्य जीवन विभाग हा सातारा या जिल्हयातआहे  तर राधानगरी वन्य जीवन विभाग हा कोल्हापूरमध्ये आहे. या जंगलाला तर ‘रानरेडा’ नाव दिलेले आहे. या तिन्ही जंगलांमध्ये चितळ, सांबर, काळवीट, रानरेडा, हरीण अगदी मुक्तपणे हिंडताना दिसतात.

पुणे व आसपासच्या भागांत पक्षीप्रेमींसाठी अतिशय सुंदर ठिकाणे आहेत. पाषाण लेक, पर्वती डोंगर, थोडे लांब गेल्यास भिगवण, उरळी-कांचन इत्यादी इत्यादी. मुंबईमध्ये जरी काँक्रीट जंगले असली तरीही भांडुप पंपिंग स्टेशन, कान्हेरी अप्पर ट्रेल, शिलोंदा ट्रेल, उरण, बारवी डॅम, कर्नाळा वगैरे ठिकाणी वेगवेगळ्या पक्ष्यांचे वास्तव्य आहे. मुंबईचे उपनगर डोंबिवली याच्या आजूबाजूला  भोपर, डोंबिवली क्रिक, पाडळे गाव, उम्ब्रोली, नंतर पनवेलचे वडाळे लेक अशा अनेक ठिकाणी पक्ष्यांचे वास्तव्य आहे.

नवेगाव राष्ट्रीय उद्यान ..विदर्भातील गोंदिया जिल्हयात नवेगाव राष्ट्रीय उद्यान आहे.गोंड आदिवासींचा राजा दलपतशाह आणि राणी दुर्गावती यांनी या भागात अनेक ठिकाणी जलाशय आणि तलाव बांधले. इथल्या तलावांवर स्थानिक पक्ष्यांसह स्थलांतरित पक्षीही येतात. सारस पक्षीही येथील तलावांना भेट देतो.

चिखलदरा ..अमरावतीपासून उत्तरेकडे १०० किलोमीटरवर असणारे चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण आहे. विविध प्रकारच्या वनस्पती, त्यांच्या प्रजाती, वृक्षप्रजाती येथे आढळतात. अस्वल, चित्ते, गवे, चितळ, सांबर, काळवीट, चौशिंगा, शेकरू यांसह काही दुर्मिळ प्राणीही येथे आहेत.

भिगवण जलाशय…अहमदनगर जिह्यातील कर्जत तालुक्यात काळवीट आणि त्याच्या प्रजातींकरिता प्रसिद्ध असलेले रेहेकुरी अभयारण्य आहे. या अभयारण्याच्या जवळच भिगवण जलाशय आहे. स्थानिक आणि स्थलांतरित जलचर प्राणी या जलाशयात येतात. खासकरून अग्निपंख (फ्लेमिंगो) पक्षी बघण्यासाठी हे ठिकाण सर्वोत्कृष्ट आहे.

कर्दळीवन …घनदाट जंगल आणि उत्तुंग पर्वतांमध्ये कर्दळीवन दडलेले आहे. दाट झाडीमुळे दिवसाढवळ्याही येथे सूर्यकिरण जमिनीवर पोहचणे कठीण असते. वाघ, सिंह, लांडगे, तरस, कोल्हे येथे मुक्त संचार करतात. दहा ते पंधरा फुटांहून अधिक उंचीची वारुळे येथे आढळतात. नाग, सर्प, अजगर इत्यादी सरपटणाऱया प्राण्यांचाही येथे सहज वावर असतो.

dear-in-jungle

पेंचमधील जैवविविधता...पेंच व्याघ्र संरक्षण प्रकल्प हा मध्य हिंदुस्थानातील सापुतारा रांगांच्या दक्षिणेकडील उतारावर वसला आहे. वाघ, चित्ता, जंगली मांजर, जंगली कुत्रा, तरस, कोल्हा आणि अंगावर ठिपके असणारा मांजरासारखा प्राणी,  याशिवाय नीलगाई, चार शिंगे असणारी काळवीट, हरण, गवे यांसह सर्पगरुड, मत्स्यगरुड, मोहोळघार, पट्टेरी पिंगळ्या, लाल निखार, राज धनेश अशी ज्यांची कधी नावे ऐकली नसतील असे प्राणी येतात.

महाराष्ट्रामध्ये सहजतेने दिसतील असे अनेक पक्षी आहेत.मोर, तांबट, हळद्या, लाल मानोली, करण पोपट, समुद्री घार, हुद, मुग्धबलाक, उचाटया, विगोरचा शिंजीर, सामान्य टीलवा, काळ्या टोपीचा धीवर, जांभळी पाणकोंबडी, थापटया, पट्टकादंब, राखी बगळा, कुदळ्या, नीलमणी, निळ्या डोक्याचा कस्तुर, शमा, शाही बुलबुल, कुरारी, राखी झोळीवाला, कापशी घार अशी अनेक नावे सांगता येतील.

जर जंगल सफारीचा विचार करत असाल तर हे कराच !

रंगीबेरंगी भडक कपडे घालू नयेत, साधारण आपले सैनिक ज्या प्रकारे पेहराव करतात त्याचेच अनुकरण करावे म्हणजे आपल्याला बघून पशू-पक्षी दूर जात नाहीत.

श्वापदे जिथे असतात तेथे चालत जाण्यासाठी बंदी असते म्हणून वाहनातून खाली उतरू नये.

खाण्याचे पदार्थ बरोबर घेऊन जाऊ नये. पशू-पक्ष्यांना काहीही पदार्थ खायला देऊ नयेत. कुठल्याही प्रकारचा कचरा करू नये.

आवाज न होणारी पादत्राणे घालावीत. पक्ष्याच्या  जवळ जाऊ नये.

निरीक्षण करताना जवळ दुर्बीण ठेवावी व त्याचा वापर करावा म्हणजे लांबूनच पक्षी न्याहाळता येऊ शकतो.

फोटो काढताना फोकल अंतर जास्त असणाऱया भिंगाने काढावेत.

कुठल्याही प्रकारचा आवाज करू नये. पशू-पक्षी घाबरून उडतात.

पक्षी पाहण्यासाठी वाहन लांब ठेवून चालतच जावे व हळूहळू पावले टाकत चालावे म्हणजे पक्षी घाबरत नाहीत.

आपल्याबरोबरीच्या लोकांशी खाणाखुणेनेच बोलावे.