फारसं कोणाला  माहीत नसलेलं…

19


अनंत सोनवणे,[email protected]

महाराष्ट्रातली ताडोबासारखी काही जंगलं पर्यटकांच्या गर्दीनं नको तितकी वेढली जात असतानाच इतर काही जंगलं मात्र पर्यटनाच्या ओझ्याखाली दबलेली नाहीत. काही वेळा भौगोलिक अंतरामुळे, काही वेळा अतिदुर्गमतेमुळे, तर काही वेळा प्रसिद्धीच्या प्रकाशझोतापासून दूर राहिल्यामुळे ही जंगलं फारशी कुणाला माहीत नसतात. स्वाभाविकच त्यामुळे तिथं माणसांचा व्यत्यय फारसा उद्भवत नाही. सच्चा निसर्गप्रेमींसाठी अशी जंगलं म्हणजे आनंदाचा अनमोल ठेवा ठरतात. अशाच जंगलांपैकी एक आहे बोरचं जंगल!

वर्धा जिल्हय़ातल्या हिंगणीजवळ हे सुंदर जंगल पसरलंय. इथं बोर नदीवर धरण बांधण्यात आलंय. धरणाचं पाणी जंगलभर पसरलंय. पाण्याकाठी छान गवताळ प्रदेश निर्माण झालाय. तिथल्या गवतावर ताव मारणारे तृणभक्षी प्राणी अगदी सहज दिसतात. या तृणभक्षी प्राण्यांची शिकार करणारे मांसाहारी प्राणीही इथं मोठय़ा प्रमाणावर आढळतात. तसंच इथल्या जंगलाच्या संपन्नतेमुळे इथलं वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आलं. त्यानंतर हे जंगल वाघासाठी उत्तम अधिवास असल्याचं ध्यानात घेऊन २०१४ मध्ये इथं व्याघ्र प्रकल्प जाहीर करण्यात आला.

भौगोलिकदृष्टय़ा बोर व्याघ्र प्रकल्प अत्यंत मोक्याच्या जागी वसलेला आहे. याच्या सर्व अंगांना देशातले सर्वात महत्त्वाचे व्याघ्र अधिवास पसरलेले आहेत. पेंच-महाराळ, नवेगाव-नागझिरा, उमरेड कऱहाडला, ताडोबा-अंधारी, मेळघाट आणि सातपुडा या वन्यजीव अभयारण्यं आणि व्याघ्र प्रकल्पांच्या मधोमध बोरचं जंगल पसरलंय त्यामुळे या सर्व जंगलांमधल्या वाघांना एका जंगलातून दुसऱया जंगलात जाण्याच्या दृष्टीनं बोर हा महत्त्वाचा कॅरिडॉर आहे. खुद्द बोर व्याघ्र प्रकल्पाच्या जंगलात कायम निवास करणाऱया वाघांची संख्याही वाढतेय. इथले बाजीराव, कतरिना वगैरे वाघ वन्यजीवप्रेमींच्या आकर्षणाचे विषय ठरले.

मार्च ते मे या काळात इथं वाघाचं दर्शन होण्याची सर्वाधिक शक्यता असते. वाघाप्रमाणेच इथं बिबळय़ाचंही वास्तव आहे. तसंच इथं रानकुत्रे, रानगवे, रानडुक्कर, अस्वल, चितळ, सांबर, काकर, नीलगाय, चौशिंगा, ताडमांजर, वानर, वटवाघूळ, ट्रिशू इत्यादी वन्यजीवही आढळतात. सरपटणाऱया प्राण्यांमध्ये नाग, धामण, तरस, तांबडय़ा पाठीचा झाडसाप, अजगर, मण्यार, घोणस, फुरसे, डुरक्या, मांजचा, दुतोंडय़ा, घोरपड, सरडा अशा अनेक प्रजाती सापडतात.

bor-forest-2

इथे स्वतःचं वाहन आत न्यायला परवानगी असल्याने निवांतपणे जंगल व वन्यजीवन पाहता येतं. अर्थात जंगलाचे आणि वनविभागाचे सर्व नियम पाळूनच जंगलाचा आस्वाद घ्यायचा असतो. बोर जंगलातल्या वन्यजीवांचं निरीक्षण करायचं असेल उन्हाळा हा उत्तम काळ. मात्र पक्षी निरीक्षण करायचं असेल तर ऑक्टोबर ते जानेवारी या काळात इथं जावं. बोर धरणाचं पाणी आणि काठावरचं समृद्ध जंगल यामुळे इथं पक्ष्यांच्या दीडशेपेक्षा जास्त प्रजाती आढळतात. त्यातल्या १0 प्रजाती स्थलांतरित पक्ष्यांच्या तर ९ प्रजाती या नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या पक्ष्यांच्या आहेत. इथं आपल्याला विविध प्रकारचे गरुड आणि घुबडं पाहायला मिळतात. तसंच शिळा, व्याघ, कोतवाल, नीलपंख, स्वर्गजांगण, राखी व मलबर धनेश, चातळ, पावशा, पोपट, टकाचोर, भारद्वाज, रंगीत करकोचा, काळा करकोचा, लालसरी, मराल बदक, चिलखा, स्नाईन, तुतारी इत्यादी पक्षीही इथं पाहता येतात.

जंगल पर्यटनासाठी नेहमीच्या जंगलांऐवजी बोर व्याघ्र प्रकल्पाला एकदा तरी सर्व वन्य जीवनप्रेमींनी अवश्य भेट द्यायला हवी.

बोर व्याघ्र प्रकल्प

प्रमुख आकर्षण…वाघ

जिल्हा…वर्धा

राज्य…महाराष्ट्र

क्षेत्रफळ…१३८.१२ चौ.कि.मी.

निर्मिती …९७०

जवळचे रेल्वे स्थानक…वर्धा (३५ कि.मी.)

जवळचा विमानतळ…नागपूर (८० कि.मी.)

निवास व्यवस्था…एमटीडीसीचे रिसॉर्ट

सर्वाधिक योग्य हंगाम…मार्च ते मे

सुट्टीचा काळ…पावसाळा

साप्ताहिक सुट्टीचा दिवस…सोमवार

 

 

आपली प्रतिक्रिया द्या