अरण्य वाचन

11

अनंत सोनवणे[email protected]

एके काळी ओरिसातले जंगली हत्ती स्थलांतर करून महाराष्ट्रात नागझिरा आणि नवेगावच्या जंगलात येत असत. त्यांच्यास्थलांतराचा मार्ग बस्तरच्या अरण्यातून जायचा. नक्षलवादामुळे कुप्रसिद्ध झालेलं हे अरण्य तेव्हा हजारो चौरस किलोमीटर पसरलेलं होतं. मात्र स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतरही महसुलाच्या हव्यासापायी बस्तरची कत्तल होत राहिली. हत्ती आणि इतर वन्यजीवांच्या स्थलांतरासाठी आवश्यक असलेली जंगलांची सलगता खंडित झाली आणि बस्तरचं सुंदर जंगल झपाटय़ानं नामशेष होऊ लागलं. सुदैवाने 1975 साली इंद्रावती राष्ट्रीय उद्यानाची स्थापना झाली आणि बस्तरच्या वन्यजीवांनी सुटकेचा निःश्वास सोडला.इथून वाहणाऱया इंद्रावती नदीच्या नावावरून राष्ट्रीय उद्यानाला त्याचं नाव मिळालं. इथला भूभाग प्रामुख्याने डोंगराळ व चढ-उताराचा आहे. हा परिसर प्रामुख्याने दमट पानगळीच्या जंगलात मोडतो. काही भागांत शुष्क पानगळीचं जंगलही आहे. साग हा इथला प्रमुख वृक्ष. शिवाय मोह, तेंदू, साल, सावर, पळस, निवस, धावडा, ऐन, खैर, अर्जुन, जांभूळ, बोर, शिसम इत्यादी वृक्षांनी हे जंगल बहरलेलं आहे. काही ठिकाणी बांबूची बेटं दिसतात, तर अन्यत्र विस्तीर्ण गवताळ प्रदेशही आढळतात.

wild-tiger-1

इंद्रावतीच्या गवताळ कुरणांमध्ये तृणभक्षी वन्यजीव सावधपणे चरताना दिसतात. त्यात चितळ, सांबर, चौसिंगा, चिंका काळवीट, तसेच नील गाईंचा समावेश असतो. तसेच अत्यंत दुर्मिळ अशा रानम्हशीही इंद्रावतीच्या जंगलात पाहायला मिळतात. आपल्या पाळीव म्हशींच्या पूर्वज असलेल्या या रानम्हशी पाच-सहा फूट उंच आणि नऊशे किलोपर्यंत वजनाच्या असतात. त्यांची अर्धवर्तुळाकार शिंगं तीन-साडे तीन फूट लांब असतात. अफाट ताकद, आक्रमकता आणि कळपाची एकजूट या बळावर या रानम्हशी वाघाशीही झुंज देतात आणि त्याला माघार घ्यायला भाग पाडतात.

तृणभक्षी प्राण्यांची विपुल उपलब्धता आणि दुर्गम डोंगराळ प्रदेशातली गर्द वनराई यामुळे इंद्रावती राष्ट्रीय उद्यान वाघाचा आदर्श अधिवास बनलंय. 1983 साली या जंगलाला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा मिळाला. त्यामुळे इथल्या वाघांना कायद्याचं संरक्षण मिळालं. एखाद्या हरणानं किंवा माकडानं विशिष्ट आवाज काढून धोक्याचा इशारा दिला की जवळपास कुठंतरी वाघाची हालचाल सुरू असणार, याची खात्री पटते. त्याचं प्रत्यक्ष दर्शन मिळणं मात्र निव्वळ नशिबाचा भाग आहे. काही वेळा बिबटय़ाचं दर्शन घडू शकतं. कधी मोहाच्या फुलांवर ताव मारणारं अस्वल समोर येतं, तर कधी एखादा रानडुक्कर, कोल्हा, लांडगा किंवा पट्टेरी तरस समोरून जातं. रानकुत्र्यांचा कळपही कधी शिकारीच्या शोधात भटकताना दिसतो. इथं गोडय़ा पाण्यातली मगर, घोरपड, विविध प्रकारचे साप आणि सरडेही पाहायला मिळतात.

birds-in-winter-3

इंद्रावतीचं जंगल एकाहून एक सुंदर पक्ष्यांचा जणू खजिनाच आहे. पक्षीप्रेमींना इथं सर्पगरुड, मच्छीमार गरुड, नागरी घार, कापशी, शिक्रा, ससाणा, पिंगळा, घुबड इत्यादी शिकारी पक्षी पाहता येतात. सफाईचं काम करणारी गिधाडं दिसू शकतात. कोकिळ, दयाळ, श्यात्रा, शिळकरी कस्तूर, मुरारी चंडोल याचं सुमधूर गाणं ऐकता येतं. तसंच इथं सुगरण, शिंपी, धनेश, टकाचोर, सूर्यपक्षी, हरेवा, हरियाल, पोपट, हळद्या, सुतार, धोबी, टिटवी, बगळे, नीळकंठ, कोतवाल, खाटीक इत्यादी पक्षीही पाहायला मिळतात.
मानवी अतिक्रमण, इंद्रावती नदीवरची धरणं, पेपर मिलसाठी बांबूची कत्तल यामुळे इंद्रावती जंगलाचा मोठय़ा प्रमाणावर ऱहास झाला आहे. सूज्ञ जनमनाचा रेटा आणि राजकीय इच्छाशक्तीच हे सुंदर जंगल वाचवू शकेल.

इंद्रावती राष्ट्रीय उद्यान
प्रमुख आकर्षण… वाघ, रानम्हैस
जिल्हा…बिजापूर
राज्य…छत्तीसगड
क्षेत्रफळ…1258.37 चौ.कि.मी.
निर्मिती…1975
जवळचे रेल्वे स्थानक…जगदालपूर (168 कि.मी.)
जवळचा विमानतळ…रायपूर (486 कि.मी.)
निवास व्यवस्था…वनखात्याचं विश्रामगृह
योग्य हंगाम…डिसेंबर ते जून
सुट्टीचा काळ…नाही
साप्ताहिक सुट्टीचा दिवस….नाही