कनिष्ठ महाविद्यालये आज बंद


सामना प्रतिनिधी । मुंबई

आंदोलने करूनही मागण्या मान्य होत नसल्याने राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांनी २ फेब्रुवारीला महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याचा फटका बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षांना बसण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघातर्फे विविध मागण्यांसाठी राज्यात पाच टप्प्यांत आंदोलन करण्यात आले. याचाच एक भाग म्हणून शुक्रवार, २ फेब्रुवारी रोजी राज्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालये बंद करून सर्व जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयांसमोर व मुंबईत आझाद मैदान येथे जेल भरो आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाचे अध्यक्ष प्रा. अनिल देशमुख यांनी दिली.

शिक्षकांच्या मागण्या

– १ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत आलेल्यांनासुद्धा जुनी पेन्शन योजना लागू करणे.

– २०१२ पासूनच्या शिक्षकांना नियुक्ती मान्यता व वेतन देणे.

– सर्व शिक्षकांना २४ वर्षांच्या सेवेनंतर निवडश्रेणी देणे.

– कायम विनाअनुदानित शिक्षकांना अनुदान द्यावे.

– माहिती-तंत्रज्ञान शिक्षकांना अनुदान द्यावे.

– २००३ ते २०११ पर्यंतच्या वाढीव पदांवरील शिक्षकांना नियुक्ती मान्यता व वेतन द्यावे.

– सातवा वेतन आयोग तातडीने लागू करावा.