कोपरगावात दरोडेखारांच्या गोळीबारात सोनाराचा मृत्यू


सामना ऑनलाइन । कोपरगाव

कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे मुख्य रस्त्यावर 7 ते 8 अज्ञात दरोडेखोरांनी लक्ष्मी लक्ष्मी ज्वेलर्स या दुकारावर दरोडा टाकला. दरोडेखोरांनी ज्वेलर्सचे मालक शाम घाडगे (वय३६) आणि गणेश घाडगे (वय ४२) या दोघांवर गोळीबार केला. त्यात शाम घाडगे यांचा मृत्यू झाला. तर जखमी झालेल्या गणेश घाडगेला तातडीने कोपरगाव येथे एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

2006 साली कोपरगाव शहारात बाजारतळ भागात काल्या नांगऱ्याच्या टोळीने भरदिवसा तीन सराफी दुकानांवर फटाके फोडत आणि दगडफेक करीत सुमारे 10 ते 15 लाख रुपयांचा ऐवज लुटण्यात आला होता. तशाच प्रकराची घटना कोळपेवाडी येथे घडली. लक्ष्मी ज्वेलर्स यांच्या दुकानाचे नूतनीकरणाचे काम सुरू होते. या दुकानातील लाखो रुपयांचे दागिने लुटून दरोडेखोरांनी पोबारा केला आहे. पोलीस उशीरा घटनास्थळी पोहचले. पोलिसांना घटनास्थळी बंदुकीतून झाडलेल्या फैरीची काडतुसे आढळली आहेत. या घटनेने तालुक्यात दहशत पसरली असून मृत घाडगे यांच्या मृतदेहाचे कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. घटनास्थळी शिर्डी पोलीस उपाधिकारी व पोलिसांचा मोठा ताफा होता. पोलिसांनी या घटनेबाबत कोणतीही माहिती देण्यास नकार दिला.