जुळ्यांचं `सुखणं’!

jyotsna-gadgil>> ज्योत्स्ना गाडगीळ

मुलगी झाल्याने निराश होणारे अनेक जण आजही आपल्या समाजात आहेत. अशा पाश्र्वभूमीवर बाजीराव पाटील आणि त्यांची पत्नी मीना ह्यांनी जुळ्या मुलींचे स्वागत केले आणि त्या दोघींना पाण्यात सूर मारायलाच शिकवले नाही, तर आयुष्याचा सूरही शोधून दिला. जलतरण स्पर्धांमध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत मजल मारलेल्या आरती आणि ज्योती पाटील २०१८ मध्ये होणाऱ्या `कॉमन वेल्थ’ खेळाच्या तयारीस लागल्या आहेत.

`भीती’ हा शब्द लहान मुलांच्या शब्दकोशातच नसतो. त्यांना फक्त झोकून देणे माहीत असते. या बेधडक वृत्तीला बालवयात योग्य वळण मिळाले तर आयुष्यात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करण्याचे बळ मुलांना मिळते. हेच लक्षात ठेवून पोलीस खात्यात नोकरीला असणारे बाजीराव पाटील ह्यांनी आपल्या जुळ्या मुलींना वयाच्या दुसऱ्या वर्षी पाण्यात उतरवले आणि त्या सरावल्यावर चौथ्या वर्षी थेट समुद्रात पोहायला लावून लिम्का बुक रेकॉर्डचे मानकरी बनवले. तेव्हापासून `जलतरणपटू’ होण्याचे ध्येय उराशी बाळगून त्या दोघींनी वडिलांच्या मार्गदर्शनाखाली सराव सुरू केला आणि आता त्यांना `कॉमन वेल्थ’ खेळातच नाही, तर `ऑलिम्पिक’ खेळातही हिंदुस्थानसाठी सुवर्णपदक मिळवायचे आहे.

जलतरणपटू होण्याचे स्वप्न मुळात होते बाजीराव पाटील ह्यांचे! ते मूळचे कोल्हापुर येथील कांचनवाडीचे. बालपणापासून त्यांना कुस्ती आणि पोहणे या खेळांची आवड होती. मात्र शास्त्रोक्त प्रशिक्षण घेता आले नाही. घरातील परिस्थिती बेताची असल्याने त्यांनी नोकरी सांभाळून शिक्षण पूर्ण केले आणि १९९४ मध्ये ते मुंबईत आले. दरम्यान पोलीस भरती सुरू होती. सर्व परीक्षा उत्तीर्ण करून ते पोलीस सेवेत रुजू झाले. वरळी येथील जलतरण तलावात पोहण्याचा सराव करू लागले. १९९७ मध्ये मुंबई पोलीस दलात आजवर कोणीही न केलेला विक्रम करण्यासाठी त्यांनी स्वत:समोर मुंबई-अलिबाग हे ३५ किमी अंतर पोहून पार करायचे उद्दिष्ट ठेवले आणि यशस्वीदेखील करून दाखवले. त्याच काळात त्यांचे लग्न झाले आणि १९९८ मध्ये त्यांना आरती आणि ज्योती या जुळ्या मुली झाल्या. त्यांनी आपले जलतरणपटू होण्याचे स्वप्न मुलींकडून पूर्ण करून घ्यायचे असा निश्चय केला. त्याच वेळेस पाटील यांनी पतियाळाचा `स्वीमिंग नॅशनल कोच’ हा सहा आठवड्यांचा सरकारमान्य अभ्यासक्रम पूर्ण केला. पाटील यांना चांगले पोहता येत होतेच, परंतु या अभ्यासक्रमामुळे त्यांना शिकवण्याचे तंत्रही अवगत झाले.

लग्नानंतर त्यांनी आपल्या पत्नीलाही पोहायला शिकवले आणि तिलाही मुंबई क्लब स्पर्धेत उतरवले. पुढे मुलींना घडवण्यात या दांपत्याने आपले सर्वस्व पणाला लावले. चार वर्षांच्या त्या दोघींना पोहण्यात आलेली सहजता पाहून त्यांनी त्या दोघींना समुद्रात उरवण्याचे ठरवले. एवढ्या लहान वयात समुद्रात ५ किमी अंतर कापणाऱ्या जुळ्या बहिणींचा विक्रम याआधी कोणीही नोंदवला नव्हता. त्यादृष्टीने पाटील यांनी महाराष्ट्र फेडरेशन येथे अर्ज केला आणि मुलींची आरोग्य तपासणी वगैरे झाल्यावर, हिरवा कंदील मिळाल्यावर हे स्वप्न सत्यात उतरवले. गेटवे ऑफ इंडियापासून सनक्रीक इथपर्यंत ५ किमीचे अंतर त्या दोघींनी न थांबता ब्रेस्टस्ट्रोक देत पार केले. समुद्रात पोहताना स्वीमिंगचा ब्रेस्टस्ट्रोक हा प्रकार सहसा कोणी करत नाही, पण त्या दोन चिमुरड्यांनी तेही करून दाखवले. त्या वेळेस दूरदर्शन, टाइम्स ऑफ इंडिया यांसह अनेक प्रसार माध्यमांनी त्यांची दखल घेतली. लिमका बुकमध्येही त्यांचे नाव नोंदवले गेले. `गिनीज बुक ऑफ वल्र्ड रेकॉर्ड’मध्ये मुलींचे नाव नोंदवा, असे अनेकांनी पाटील यांना सुचवले. परंतु, आपण त्यांच्याकडे जाण्याऐवजी, त्यांनी आपल्या कार्याची दखल घ्यावी, अशी त्यांची अपेक्षा होती.

पाटील सांगतात, `गिनीज बुकमध्ये नाव येणे हे आमचे ध्येय नाही, तर ऑलिम्पिक स्पर्धेत हिंदुस्थानसाठी सुवर्ण पदक कमावून आणणे हे आमच्यासाठी जास्त गौरवास्पद आहे. त्यादृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत. २०१६ मध्ये `साऊथ एशियन स्कुल गेम्स’ या आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धेत आरती आणि ज्योतीला हिंदुस्थानतर्फे इंडोनेशिया येथे पाठवले होते. तिथे आरतीला ९ वा, तर ज्योतीला १२ वा क्रमांक मिळाला होता. तसेच अलीकडेच भोपाळ येथे झालेल्या `७१ व्या ग्लेनमार्क सीनिअर अक्वाटिक चॅम्पियनशिप’ स्पर्धेत ज्योतीने महाराष्ट्राला `सुवर्णपदक’ तर आरतीला सहावा क्रमांक मिळाला. तसे असूनही सरकार दरबारी त्यांची दखल घेतली गेली नाही, ह्याचे वाईट वाटते. क्रीडा क्षेत्राचे हेच दुर्दैव आहे. हिंदुस्थानात उत्तम खेळाडूंची संख्या कमी नाही, परंतु त्यांना योग्य वेळेत योग्य मार्गदर्शन, आहार आणि आर्थिक मदत केली जात नाही. त्यांच्या यशाची दखल घेऊन प्रोत्साहन दिले जात नाही ह्यामुळे इतर देशांच्या तुलनेत भारताला बहुतांशी रौप्य, कास्य पदकांवर समाधान मानावे लागते!’

महाराष्ट्राच्या दोन कन्या राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर जाऊन आपल्या राष्ट्राचे, देशाचे नाव उंचावत आहेत, परंतु त्यांच्या वाट्याला पुरेशी प्रसिद्धी आली नाही. मध्यंतरी शबांग मोशन हाऊसच्या `ह्युमन्स ऑफ बॉम्बे’नावाच्या लघुपट करणाऱ्या संस्थेने पाटील भगिनींची कहाणी फेसबुक आणि यु ट्यूबच्या माध्यमातून लोकांसमोर आणली, तेव्हा कुठे प्रसारमाध्यमांचे लक्ष त्यांच्याकडे वेधले गेले आहे. मात्र, याबाबत सुख-दु:खं न बाळगणारे पाटील कुटुंबीय ध्येयावर लक्ष टिकवून आहेत.

वडीलच प्रशिक्षक असल्यामुळे त्या दोघींना ह्या क्षेत्रात उतरताना कधीच असुरक्षित वाटले नाही. त्या आपले सर्व लक्ष पोहण्यावर केंद्रित करू शकल्या. आजवर झालेल्या अनेक स्पर्धांमध्ये दोघी बहिणींनी थोड्याफार अंतराने बाजी मारत ३५० हून अधिक मेडल्सचा खजिना साठवला आहे, त्यात २१ मेडल्स राष्ट्रीय पातळीवर मिळाली आहेत. वरळी येथील पोलीस कॅम्पमधील त्यांच्या घराच्या भिंती पुरस्कारांनी सजल्या आहेत. त्यांचा धाकटा भाऊ दीपक हादेखील त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत जलतरणपटू होण्याच्या दृष्टीने प्रवास करत आहे. त्याने पोहण्याबरोबरच फुटबॉलमध्येही अनेक पारितोषिके मिळवली आहेत. आजवर झालेल्या सर्व स्पर्धांची नोंद या दोन्ही भगिनींनी आपापल्या डायरीत सुवाच्य अक्षरात करून ठेवली आहेत.

जलतरणपटू व्हायचे म्हणजे केवळ पोहण्याचा सराव करून भागत नाही, तर त्याला चांगल्या आहाराची, पथ्याची आणि व्यायामाची जोड द्यावी लागते. त्याकडे त्यांच्या आईचे काटेकोरपणे लक्ष असते. खर्चाचा ताळमेळ बसवणे हे त्यांच्यासमोर आव्हान असते. सुदैवाने `वेलस्पन’ नावाची कॅंम्पनी गेल्या काही वर्षांपासून त्या दोघींच्या आहाराचा आणि व्यायामाचा खर्च उचलत आहे. पोहण्याची कला दोघींना उत्तमप्रकारे अवगत झाल्याने अनेकांनी त्यांना खाजगी प्रशिक्षक म्हणून शिकवण्यासाठीही विचारपूस केली. परंतु पैसे कमावण्याच्या नादात मुलींचे लक्ष त्यांच्या ध्येयापासून विचलित होऊ नये, म्हणून पाटील ह्यांनी तो प्रस्ताव वेळोवेळी नम्रपणे परतावून लावला. वसाहतीतील लहान मुलांना, तसेच पोलीस कॅम्प तलावात शिकायला येणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकवण्याची मुभा दिली.

मुलींचा रोजचा सराव घेण्यासाठी पाटील यांनी रात्रपाळी मागून घेतली. ते रोज सकाळी घरी गेल्यावर थोडा आराम करतात आणि पुन्हा तलावावर पोहोचतात. वडील येईपर्यत त्या दोघी व्यायाम करतात आणि बाबा आले की, रोज सकाळ-संध्याकाळ दीड-दीड तास पोहण्याचा सराव करतात. ऊन-वारा-पाऊस, कौटुंबिक सोहळे, दहावी-बारावी परीक्षा, आजारपणे अशा कोणत्याही कारणांमुळे त्यांच्या सरावात आजवर खंड पडलेला नाही.
पाटील कुटुंबीय अतिशय शिस्तप्रिय आहे. पाटील दांपत्याच्या वागण्या-बोलण्यात जेवढा नेमकेपणा दिसतो, तोच त्यांच्या मुलांमध्येही आढळतो. आमचे स्वप्न मुलांनी पूर्ण करून दाखवले आणि अजूनही त्यांना अहंकाराचा वारा लागलेला नाही, असे पाटील अभिमानाने सांगतात.

पाटील यांनी वरळी येथील जलतरण तलाव येथे १० वर्षे प्रशिक्षक म्हणून नोकरी केली. आता ते वांद्रे येथील निर्मल नगर पोलीस ठाण्यात नोकरीत आहेत. पोलीस दलात नोकरी करून त्यांना २४ वर्षे झाली. २००३ मध्ये त्यांनी आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धेत भाग घेतला होता. त्या वेळी ग्रीक समुद्रात सलग १३ तास पोहण्याचा अनुभव घेतला होता. त्यांना पूर्णवेळ क्रीडा प्रशिक्षक होता आले असते, परंतु गरजेच्या वेळी त्यांना पोलीस खात्यातील नोकरीने आधार दिला होता, त्याबद्दल कृतज्ञता म्हणून त्यांनी सुगीचे दिवस आल्यानंतरही नोकरी न सोडण्याचा निश्चय केला.

पाटील यांना जशी त्यांच्या वरिष्ठांची साथ लाभली, तशीच साथ आरती आणि ज्योतीला त्यांच्या शाळा आणि महाविद्यालयात लाभली. शारदाश्रम विद्यालयाने त्यांच्या स्पर्धांच्या वेळा सांभाळून त्यांना परीक्षांची सवलत दिली, तर रुईया महाविद्यालयाने त्यांच्या स्पर्धांना प्राधान्य देण्यासाठी कॉलेज `बंक’ करण्याची मुभा दिली. तसे असले, तरी ह्या दोघींनी अभ्यासाकडे कधीच दुर्लक्ष केले नाही. दहावीत दोघींनी ८३ टक्के, तर बारावीत ८२ टक्के मिळवले. तिथेही मार्कांमध्ये अंतर नव्हतेच!

जुळ्या भावंडांना पाहून आपला गोंधळ होतो, पण त्यांच्या पालकांचा नाही. त्या दोघींच्या बाबतीत पाटील सांगतात, ‘या दोघी स्पर्धेत एकत्र पोहत असताना त्यांच्या पोहण्याच्या शैलीवरून आरती कोण आणि ज्योती कोण हे आम्ही ओळखतो, परंतु बऱ्याचदा सूत्रसंचालकाचा गोंधळ होतो. स्पर्धकांच्या शर्यतीचे वर्णन ते क्रमांकानुसार करत असले, तरी आयत्या वेळेस दोघींच्या नावात चुकून फेरबदल होतो. अलीकडेच पंजाब येथील स्पर्धेत आरतीला रौप्यपदक मिळाले, पण फोटो छापून आला ज्योतीचा! पण असे मजेदार किस्से त्या दोघी गमतीने घेतात. त्यांच्यात चढाओढ आहे ती जिंकण्याची, एकमेकींना हरवण्याची नाही! निरोगी स्पर्धात्मक वातावरण त्यांच्या यशाला पूरक ठरत आहे. हेच आमच्या जुळ्यांचं `सुखणं’ आहे.’
(संपर्क : ९८७०२६२११६ / ९०८२४७२७४१)