भक्तीचा प्रसार करणारे संतकवी

नामदेव सदावर्ते

सगळ्या जगाचा पालनकर्ता श्री विठ्ठल पंढरपूरला विटेवर उभा आहे. तिथे संतांचा मेळावा भरतो. नामस्मरणाशिवाय त्याचे भक्त इतर काही जाणत नाहीत. नामा दर्जीच्या हातून तो दूध पितो. जनाईसंगे दळण दळू लागतो. सारे भक्त त्याला प्राणप्रिय आहेत. त्याला जातपात समजत नाही. तो सर्वांचा पिता आहे. त्याचे भक्तही जातभेद, पंथभेद, धर्मभेद मानत नाहीत. संतांनी आपले विचार अत्यंत परखडपणे मांडले असून संत कबीर अनेक अभंगांतून विनोदाचा वर्षावही करतात. हिंदू-मुस्लिम असा भेदभाव न मानता केवळ भक्तीचा प्रसार करीत कबीर जगले.

संत कबीर हे पंधराव्या शतकातील प्रसिद्ध कवी होते. उत्तर  हिंदुस्थानातील संत कबीर महाराष्ट्रातील श्री विठ्ठल या दैवताचे भक्त होते. ज्येष्ठ पौर्णिमेस काशीमधील एका तलावाच्या काठी टाकून दिलेले एक नवजात अर्भक तिथून जाणाऱया निरू व निमा या विणकर पती-पत्नीला आढळले. त्यांनी घरी आणून त्याचे स्वतःच्या मुलासारखे पालनपोषण केले. तोच पुढे ‘कबीर’ या नावाने प्रसिद्ध झाला. कबीर आपल्या काव्यात अनेक ठिकाणी आपण काशीचे विणकर असल्याचे सांगतात.

प्रपंचात राहूनसुद्धा ईश्वरभक्ती करून परमार्थ साधता येतो असा त्यांचा विश्वास होता. वस्त्र्ाs विणण्याचे कष्टाचे काम करून कसेबसे कुटुंबाचा भार ते वाहत होते. ते सदैव अध्यात्म चिंतनात मग्न असत. ते श्रीरामभक्त होते. रामनामाचे स्मरण करीत ते विणकाम करीत असताना अनेक वेळा श्रीराम त्यांना विणकामात मदत करीत असत.

कबीर हे ज्ञानी भक्त होते. हे ज्ञान त्यांनी फक्त सत्संगातूनच मिळविले होते. त्यांना कुठल्याही पाठशाळेत जाऊन शिक्षण मिळाले नाही. ते स्वतःच एका अभंगात म्हणतात-

मसि कागद छुयो नही, कलम गह्यो नही हाथ ।

मानवी देह हा एक बंगला आहे व त्यात भगवान श्रीराम स्वतः राहतात. पंचतत्त्वांचे दगड व त्रिगुणांचा चिखल करून या बंगल्याच्या भिंती उभ्या केल्या आहेत. त्याला दहा दरवाजे असून मधोमध एक खांब आहे. या बंगल्यात राहणारा देव कसा येतो अन् कसा जातो हे कुणासही कळत नाही हे एक आश्चर्य आहे.

औट हाथ का मानव देह अल्ला ने तुज दिया ।

खाया पिया सुखसे सोया नाहक जमाना खोया ।।

नरदेहाचे सार्थक फक्त प्रभुनामस्मरण करण्यातच आहे असे संत कबीर सांगतात –

कहत कबीर सुनो भाई साधू । राम नाम सबसे मीठा ।

इधर उधर काहेकू देखे । सबही बाजार झुठा ।

आई, वडील, बायको, भाऊ-बहीण, मेहुणे या सर्वांना सतत मदत केली, पण आपल्या दुःखाच्या काळी कोणीही धड गोड बोलतही नाही. सुंदर नरदेह मिळाला आहे तर केवळ रामभजन कर. कोण कोणाचा मित्र अन् कोण कोणाचा सोयरा! सारेच स्वार्थी अन् लोभी असतात.

सगळ्या जगाचा पालनकर्ता श्री विठ्ठल पंढरपूरला विटेवर उभा आहे. तिथे संतांचा मेळावा भरतो. नामस्मरणाशिवाय त्याचे भक्त इतर काही जाणत नाहीत. नामा दर्जीच्या हातून तो दूध पितो. जनाईसंगे दळण दळू लागतो. सारे भक्त त्याला प्राणप्रिय आहेत. त्याला जातपात समजत नाही. तो सर्वांचा पिता आहे. त्याचे भक्तही जातभेद, पंथभेद, धर्मभेद मानत नाहीत. संतांनी आपले विचार अत्यंत परखडपणे मांडले असून संत कबीर अनेक अभंगांतून विनोदाचा वर्षावही करतात. हिंदू-मुस्लिम असा भेदभाव न मानता केवळ भक्तीचा प्रसार करीत कबीर जगले.

हरिस्मरण करा, संगत चांगली धरा, व्यसनांपासून दूर रहा. शरीराचा, ज्ञानाचा, बळाचा व सत्तासंपत्तीचा गर्व करू नका असा सरळ सोपा उपदेश करणारे संत कबीर म्हणतात –

संगत मत करना खोटी । दुनिया उलटी है झुठी ।।

सगा भाई को बुरा बोले सालेकू सन्माना ।।

माईबाप तो भीक मांगे ससुरेकू जमखाना ।।

देवाने नाक दिले ते सुवास घेण्यासाठी, डोळे दिले ते जग पाहण्यासाठी, कान दिले ते वेद-पुराणे ऐकण्यासाठी, तोंड दिले ते भजन करण्यासाठी, हात दिले ते दानासाठी, पाय दिले ते तीर्थयात्रेसाठी. अशा जगात राहून कर्म कर अन्यथा गर्वाने हानी होईल. ते म्हणतात –

गाफल मत रहेना बेटा, सिरपर जम मारे सोटा ।

लख चौऱयांशी गिरके म्याने अवचित नर तनू पाया ।

कवडी कवडी माया जोडी लाख करोडो मोटी ।

जब आवे जमकी चिठी साथ न आवे लंगोटी ।।

अंधश्रद्धा, देवाला कोंबडे, बकरे बळी देणे, शेंदूर माखल्या दगडाला नवस करणे याविषयी संत कबीर परखडपणे सांगतात –

फत्तर उपर शेंदूर डारे । मुरख कहे ये देव मोटे ।

नवस लवकरे देवकू नारळ फुटे । देवके आगे डारे कटोरे ।

आपण खा गये गोटे । सजीव बकरा निर्जीव देक काटे ।

आपले हे शरीर नाशवंत आहे. याचा गर्व करणे योग्य नाही. काळवेळ येताच शरीर प्राणहीन होते, मृत होते. या शरीरासाठी मोठा महाल तयार केला, पण मृत्यू जंगलात आला. लाकडाची मोळी जळते तशी शरीरातील हाडे जळतात. घास, गवताची पेंडी जळते तसे हे शरीर जळून राख होते.

ये तनु मुंडना बे मुंडना । आखर मिट्टीमे मिल जाना ।

मट्टी कहे कुंभारकूं बे तूं क्यो खोदे मुजकूं ।

काई बखत ऐसा आवेगा की मै गाडूंगी तुजकूं ।

तीर्थयात्रेला भटकत फिरण्यापेक्षा मन हेच काशी, गंगा आहे. त्यात स्नान करून पवित्र व्हा. मनात ईश्वरचिंतन, नाम-स्मरण करा.

मन मथुरा, दिल द्वारिका, काया काशी ।

दस द्वारके अंदर मै हुँ शिव अविनाशी ।।

नामस्मरणातच मन रमवा. श्रीहरी सर्वश्रेष्ठ व समर्थ आहे. त्यापेक्षा कोणी मोठा नाही. अनेक दाखले देताना संत कबीर म्हणतात-

हरिसे कोई नही बडा, दिवाणे क्यो गफलत में पडा ।

प्रल्हाद बेटा हरिसे लपटा, जबी खंब कडकडा ।।

हिंदू-मुस्लिम असा देवाजवळ भेदभाव नाही. हिंदू धर्मात ब्राह्मण, तर मुसलमान धर्मात काजी असतात. राम-रहीम एक आहे हे ज्याला समजत नाही तो मूर्ख समजावा. संत कबीर म्हणतात-

ओही मुर्शद ओही मौला, वोही बना है पीर ।

अब कहां पकरू निजाम, रोजा ओही भरा भरपूर ।

भाव भगत से साई खडा, देखो जाके पंढरपूर ।

आपल्या कर्मानुसार फळ मिळते. सत्कर्म, नामस्मरण, भक्ती केली तर मनातील परमात्म्याची ओळख होऊन जीवन आनंदी होते. व्यसन, द्वेष, मत्सर, लोभ यांच्या आधाराने केलेली दुष्कर्मे आपल्या नाशाला कारण ठरतात. म्हणून सत्य, सत्कर्मे करा असे सांगतात-

कौरव पांडव दोनो भाई, एक सच्चा एक झुठा ।

सच्चा तो बैकुंठ जावे, झुठा नरक में बैठा ।