आद्य शंकराचार्यांवरही जमावाचा हल्ला होऊ शकतो- कैलाश सत्यार्थी

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

देशात जमावाकडून होणाऱ्या मारहाणीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. हा चिंतेचा विषय असल्याचे सांगत अशा घटनांचा राजकीय स्वार्थासाठी वापर करणे अयोग्य असल्याचे मत नोबेल पारितोषिक विजेते कैलाश सत्यार्थी यांनी व्यक्त केले. देशाच्या विकासासाठी अशी परिस्थिती घातक आहे. या वातावरणात आद्य शंकराचार्य आणि मंडन मिश्र यांच्यात शास्त्रार्थ होऊ शकत नाही. जमावच शंकराचार्यांवर हल्ला करू शकतो अशी गंभीर परिस्थिती असल्याचे सत्यार्थी म्हणाले.

जमावाकडून एखाद्याला मारहाण करणे आपल्या हिंदुस्थानी संस्कृतीत शोभत नाही. हिंदुस्थानची ही परंपरा नाही. चर्चा संवादातून वादाचा विषय संपवण्याचा आपला इतिहास आहे. आद्य शंकराचार्य आणि मंडन मिश्र यांच्यात शास्त्र्ाार्थावरून चर्चा झाली होती, मात्र आजच्या काळात हे होऊ शकत नाही. कोणाचेही ऐकण्यापूर्वी जमाव हल्ला करेल अशी भीती प्रत्येकाच्या मनात आहे. लोकांची भीती आणि दहशत वाढत आहे ही चिंतेची बाब असल्याचे ते म्हणाले.

बघ्याच्या भूमिकेमुळे घटनांमध्ये वाढ
सर्वात गरीब आणि दुर्बल माणसांना न्याय मिळायला हवा. अन्याय होत असताना सबलांनी फक्त बघ्याची भूमिका घेणे योग्य नाही. त्यामुळे समाजकंटकांना प्रोत्साहन मिळत असून अशा घटनांमध्ये वाढ होते. तसेच भावुक प्रतिक्रिया देण्यामुळेही तणावात वाढ होते. समाजकंटक किंवा बलात्काऱयांना धर्म नसतो. ते राक्षस प्रवृत्तीत येतात. सोशल मीडियामुळे याला खतपाणी मिळत असल्याचे सांगण्यात येते, मात्र समाजात जे होत आहे तेच सोशल मीडियावर दिसत असल्याचे ते म्हणाले. राजकारण, समाजकारण यांचा स्तर घसरला आहे. धर्मगुरूही समाजासमोर आदर्श निर्माण होईल असे वर्तन करत नसल्याचे ते म्हणाले.

कोणत्याही प्रकरची हिंसा अमान्य
जमावाकडून होणारी मारहाण, खून, हत्या, दंगल, कोणत्याही प्रकारची हिंसा अमान्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. काही लोकांना वाटते की अशा घटनांचा राजकीय स्वार्थासाठी उपयोग होऊ शकतो. सोशल मीडियाद्वारे आपल्याला प्रसिद्धी मिळेल, मात्र त्यांची हे विचार अयोग्य आहेत. देशाला हे घातक असल्याचे ते म्हणाले.