कळंगुट पोलिसांकडून सेक्स रॅकेट उध्वस्त; 2 दलालांना अटक, 3 युवतींची सुटका

सामना प्रतिनिधी । पणजी 

कळंगुट पोलिसांनी धाडसी कारवाई करत सेक्स रॅकेट उध्वस्त करण्यात यश मिळवले आहे. 2 दलालांच्या मुसक्या आवळतानाच गुजरात, प.बंगाल आणि मुंबईच्या 3 युवतींची सुटका केली आहे.

पोलीस निरीक्षक जीवबा दळवी यांनी दिलेल्या माहीती नुसार गेल्या 10 दिवसांपासून ओडिशा येथील संतोष कुमार आणि कांदोळी येथील मंजूनाथ बेलगानुर हे दोघे मिळून सेक्स रॅकेट चालवत असल्याचा संशय असल्याने त्यांच्यावर पाळत ठेवण्यात आली होती. हे दोघे पांढऱ्या रंगाच्या आय 20 कार मधून फिरत असल्याची पक्की माहिती पोलिसांना मिळाली होती.

पोलिसांनी बुधवारी बोगस ग्राहक तयार करून उपलब्ध माहितीच्या आधारे सापळा रचला. पोलिसांनी बोगस ग्राहकाच्या माध्यमातून दलालांशी संपर्क साधुन सौदा पक्का केला. दलालांनी त्यांना माडडोवाडो येथे युवती नेण्यासाठी बोलावताच पोलिसांनी माडडोवाडो गाठुन फील्डिंग लावली.

ठरल्याप्रमाणे संशयित दलाल GA08 K 9225 या कार मधून पोचले आणि त्यांनी पोलिसांच्या बोगस ग्राहका सोबत पैशांवरुन घासाघीस सुरु केली. त्याच वेळी दबा धरून बसलेल्या पोलिसांच्या पथकाने तेथे घाव घेऊन दोन्ही दलालांच्या मुसक्या आवळल्या आणि 3 पीडित युवतींची सुटका केली.

कळंगुट पोलिसांनी या धाडीत 1 लाख 20 हजार रुपये किंमतीचे 6 मोबाइल फोन,20 हजार रुपयांची रोकड आणि युवतींची ने आण करण्यासाठी वापरलेली कार जप्त केली. आज दुपारी 3 ते 6 दरम्यान ही कारवाई करण्यात आली. दोन्ही दलालां विरोधात मानवी तस्करी कायद्या अंतर्गत गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. पीडित युवती गुजरात, प.बंगाल आणि मुंबई येथील आहेत. सुटका केलेल्या तिन्ही युवतींची रवानगी मेरशी येथील अपना घर मध्ये करण्यात आली आहे.

या प्रकरणात अटक झालेल्या संतोष कुमार याला यापूर्वी देखील 2 वेळा अशाच प्रकरणात अटक झालेली आहे. मंजूनाथला सुद्धा गेल्या वर्षी कळंगुट पोलिसांनी यापूर्वी अटक केली होती.

पोलीस निरीक्षक जीवबा दळवी यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. या पथकात पोलिस उपनिरीक्षक सीताराम मळीक, महिला पोलिस उपनिरीक्षक सपना गावस, हेड कॉन्स्टेबल सुभाष मालवणकर, कॉन्स्टेबल विद्यानंद आमोणकर, समीर सावंत, महेंद्र च्यारी, दीपिका हरमलकर, मिथिला बायेकर आणि होप फाउंडेशनच्या एंड्रिया परेरा यांचा समावेश होता.