स्वप्नांपुढे आकाश खुंटले, ‘तिने’ लग्नानंतर जिद्दीने फौजदारपद मिळवले

लक्ष्मण ढोबळे । लोणी धामणी

स्पर्धेच्या युगात यश मिळवण्यासाठी मनामध्ये जिद्द, चिकाटी आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर आपण त्यामध्ये यश मिळून उच्च पदावर पोहचू शकतो. ही किमया केली आहे आंबेगाव तालुक्यातील खडकी (पिंपळगाव) येथील एका गरीब घरच्या कल्पना सुनील राक्षे या महिलेने. पहिल्याच प्रयत्नात फौजदार होण्यात तिने यश मिळविले आहे.

आंबेगाव तालुक्यातील खडकी येथील अल्प भूधारक शेतकरी कुटुंबातील सुनील कोडिंभाऊ राक्षे हे भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यात सुरक्षा रक्षकाचे काम करत आहेत. त्यांची पत्नी कल्पना राक्षे यांनी वाणिज्य शाखेतून पदवीचे शिक्षण घेतले असून त्यांना सहा वर्षीचा एक मुलगा आहे. घरातील सर्व जबाबदारी तसेच मुलाचे संगोपन करत असताना आपणही काही तरी वेगळे करून सरकारी नोकरी मिळवायची या उदेशाने पोलीस दलात भरती होण्यासाठी पारगाव येथील पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्रात येऊन सहा महिने सराव केला आणि पोलीस दलात भरती होण्याची तयारी केली.त्याच बरोबर त्यांनी एमपीएससीचा अभ्यास सुरू ठेवला.

महिलांना पोलीस दलात भरती होण्यासाठी वयाची अट २५ वर्ष आहे. पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न पहात असताना यांचे २५ वर्ष वय पूर्ण झाले यामुळे पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न अपुरे राहते की काय हे वाटत असताना राज्य सरकारने महिलांना पोलीस भरती साठी वयोमर्यादा २८ केली आणि पुन्हा भरती साठी जोमाने तयारी सुरु केली. २०१७ मध्ये मुंबई पोलीस दलात त्यांची निवड झाली.

कल्पना राक्षे यांना पोलीस दलात भरती झाल्याचा आनंद तर होताच त्याचबरोबर त्यांनी पोलीस दलात अधिकारी होण्याचेही स्वप्न पहिले होते. त्यासाठी त्या स्पर्धा परिक्षेतील एमपीएससी परिक्षेची तयारी करीत होत्या. पतीची साथ व प्रोत्साहन त्यांना मिळत होतं आणि नुकताच एमपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर झालाव त्यामध्ये त्या उत्तीर्ण झाल्या. फौजदार होण्याचे स्वप्न कल्पना राक्षे यांनी पूर्ण केले. समाजातील इतर विवाहित महिलांना राक्षे यांचा आदर्श घेण्यासारखा आहे.