कालवा पूर्ण न केल्यास लोकप्रतिनिधींना गावबंदी

10

सामना प्रतिनिधी, कळवण

सुळे उजवा कालव्याचे अपूर्ण काम तात्काळ सुरू करावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. तसेच आगामी निवडणुकीत आमदार, खासदारांना गावबंदी करण्याचा इशारा पंचायत समितीच्या सदस्यांनी दिला आहे.

सध्या राज्यासह कळवण तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण आहे. त्याच्या झळा तालुक्यातील पाटविहीर शिवाराला जास्त जाणवत आहेत. तालुक्यातील पुनंद धरणाच्या सुळे उजव्या कालव्याचा शेवट पाटविहीर गावापासून कळवण शिवारातील गिरणा नदीच्या नकटय़ा बंधाऱयापर्यंत होतो. 12 वर्षांपासून पाटविहीर गावापर्यंत पाट व पाणी पोहोचले नसल्याने येथील शेती कोरडवाहूच राहिली आहे. येथील ग्रामस्थांवर मोलमजुरी करण्याची वेळ आली आहे. कळवण तालुक्यातील पुनंद प्रकल्पाच्या सुळे उजव्या कालव्याचे 21 किमीचे काम 2005-2006 मध्ये 20 कोटी 36 लाख 86 हजार रुपये खर्च करून करण्यात आले आहे. मात्र या कालव्याच्या मातीकाम, काँक्रिटीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे केले आहे. तसेच या कालव्याच्या कामात वाढीव निविदा काढून मोठा भ्रष्टाचार झाला आहे.

या कालव्याचे काम पूर्ण झाल्याचे शासनदरबारी दाखविले गेल्याने या भागातील शेतकऱयांना शासनाच्या कोणत्याच योजनांचा लाभ मिळाला नाही. योजनाही गेल्या व पाणीही न मिळाल्याने या भागाला पाणीटंचाईचा 12 वर्षांपासून सामना करावा लागत आहे. येथील नागरिकांची अडचण ओळखून तत्काळ अपूर्ण कालव्याचे काम पूर्ण करावे. याच वर्षी उन्हाळय़ात आवर्तन सोडावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडून आगामी निवडणूक काळात तालुक्यातील लोकप्रतिनिधी, आमदार, खासदारांना गावबंदी करण्याचा इशारा पंचायत समितीच्या सदस्या मीनाक्षी चौरे व कळवण पंचायत समितीचे माजी सभापती बापू भोये, पाटविहीरचे सरपंच उत्तम जगताप, माजी सरपंच श्रावण पालवी, ग्रामपंचायत सदस्य निर्मला भोये, सुरेश जगताप, हिराबाई बागुल, सुनंदा जगताप, शिवाजी चौरे, पोलीस पाटील, रामचंद्र भोये, वसंत बागुल, पाटविहीर ग्रामस्थयांनी दिला आहे.

कालव्याची परिस्थिती…
कालव्याला पाणी वाहण्यासाठी योग्य चढ-उतार नसल्याने पाणी आतापर्यंत 0 ते 16 किमीपर्यंत अत्यंत कमी दाबाने येत आहे. हा कालवा 0 ते 21 किमीचा असून 16 ते 21 किमीतील शेतकरी या कालव्याच्या पाण्यापासून वंचित राहिले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या