कळव्याची अंगणवाडी बनली ‘भूत बंगला’


सामना ऑनलाईन । कळवा

जिल्हा परिषदेच्या शाळा हायटेक करीत असल्याचा दावा प्रशासनाने केला असला तरी कळव्याच्या सम्राट अशोकनगर येथे असलेली अंगणवाडी क्रमांक 78 जणू ‘भूत बंगला’ बनला आहे. गळके छप्पर, भिंतींना तडे आणि शिक्षकांचा पत्ताच नाही असे या अंगणवाडीचे स्वरूप बनले असून 40 विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्यच धोक्यात आले आहे. ही अंगणवाडी धोकादायक झाल्याने कोणत्याही क्षणी कोसळेल अशी भीती असून अंगणवाडी वाचवा हो.. अशी आर्त हाक विद्यार्थी व पालकांनी दिली आहे.

सरकारने शिक्षण हक्क कायदा केला असला तरी शहरी भागातील विद्यार्थीच शिक्षणापासून वंचित राहात असल्याने संताप व्यक्त होत आहे. कळव्याचा सम्राट अशोकनगर हा भाग झोपडपट्टीचा म्हणून ओळखला जातो. तेथील गोरगरीब मुलांसाठी जिल्हा परिषदेमार्फत अंगणवाडी सुरू करण्यात आली. मात्र अंगणवाडीच्या भिंती, छप्पर तसेच आतील वस्तूंची दुर्दशा झाल्याने ठाणे महानगरपालिकेने ही इमारतच धोकादायक म्हणून दोन वर्षांपूर्वी जाहीर केली. त्यानंतर अंगणवाडीला टाळे ठोकण्यात आले.

विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून याच सम्राट अशोकनगरमधील  लक्ष्मीबाई या दानशूर मध्यमवर्गीय महिलेने आपल्या स्वतःच्या राहत्या घराचा काही भाग अंगणवाडीसाठी उपलब्ध करून दिला. जिल्हा परिषदेकडून या महिलेला जागेपोटी साडेसातशे रुपये दर महिना भाडे मिळायचे. मात्र गेल्या सात महिन्यांपासून हे भाडेदेखील मिळणे बंद झाले आहे. विद्यार्थ्यांची सोय झाली तरी शिक्षक मात्र येतच नसल्याने या अंगणवाडीचे करायचे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. ठाणे जिल्हा परिषदेचे प्रशासन ग्रामीण भागातील अंगणवाडय़ा तसेच शाळा हायटेक करण्यासाठी प्रयत्न करीत असतानाच कळव्यासारख्या भागातील अंगणवाडीकडे मात्र दुर्लक्ष होत असल्याने पालक संतप्त झाले आहेत.