VIDEO: कळवा स्थानकात फटका गँगचा बळी, आरोपी अटकेत


सामना ऑनलाईन । ठाणे

लोकल ट्रेनने प्रवास करत असाल तर फटका गँग पासून सावधान रहा, असे आवाहन आपण नेहमी ऐकत असतो. मात्र याच फटका गँगचा नाशिकमधील चेतन अहिरराव (35) बळी ठरला आहे. चेतनच्या हातावर फटका मारणाऱ्या आरोपीला ठाणे रेल्वे पोलिसांनी अजय सोलंकी या आरोपीला अटक केली असून त्याला 3 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

नाशिकहून मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी चेतन दिवा येथे आला होता. 19 ऑगस्टच्या मध्यरात्री 12.54 वाजता सीएसटीएम हून कल्याणच्या दिशेने जाण्याऱ्या लोकलच्या दरवाज्यात फोनवर बोलणाऱ्या चेतनच्या हातावर मोबाईल चोराने फटका मारला. त्यामुळे चेतनचा तोल जावून तो धावत्या लोकलमधून कळवा स्थानकात कल्याणच्या दिशेने फलाट संपल्यावर पडला. त्यामध्ये चेतनचा जाागीच मृत्यू झाला. याप्रकरणी अपघाताची नोंद केली होती. हा सर्व घटनाक्रम कळवा रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. सीसीटीव्हीच्या साहाय्याने ठाणे रेल्वे पोलिसांनी बुधवारी आरोपीला अटक केली असून 3 सप्टेंबर पर्यंत आरोपीला पोलीस कोठडी देण्यात आली आहे.