धक्कादायक! कचरा उचलणाऱ्या जेसीबीने मुलीलाही उचलले

प्रातिनिधिक

सामना प्रतिनिधी । ठाणे

डम्पिंग ग्राउंडवर कचरा गोळा करणाऱ्या जेसीबीच्या पंजाने कचऱ्याबरोबर कचरावेचक मुलीलाही उचलल्याने ही मुलगी गंभीर जखमी झाली आहे. आज (सोमवार) दुपारी १ वाजण्याच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला. यामध्ये मुलीच्या दोन्ही पायांना गंभीर जखम झाली असून तिच्यावर रुख्मिणीबाई रुग्णालयात उपचार सुरू असल्याची प्राथमिक माहिती आहे.

बानू राजस वागे (१८) असे या मुलीचे नाव असून नेहमीप्रमाणे ती डम्पिंग ग्राउंडवर कचरा वेचत होती. तर तिच्याशेजारी असणारा जेसीबीमार्फत कचरा गोळा करण्याचे काम सुरू होते. अचानक या जेसीबीच्या पंजाने कचरा गोळा करता करता या मुलीलाही उचलल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. मुलीला उचललेले पाहताच आजूबाजूच्या कचरावेचक महिलांनी आरडाओरडा करीत जेसीबी चालकाला थांबविण्याचा इशारा केला. मात्र हा चालक मोबाईलवर गाणी ऐकत होता आणि कानात हेडफोन घातलेले असल्याने या महिलांचा आवाज त्यांच्यापर्यंत पोोचू शकला नाही. त्यामूळे संतप्त महिलांनी जेसीबीवर दगडफेक करून त्याचे लक्ष वेधल्याचेही या प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. त्यानंतर कचऱ्याच्या ढिगारा उपसून महिलांनी या मुलीला बाहेर काढले असता तिच्या दोन्ही पायाला गंभीर जखमा झाल्याचे आढळल्याने तिला तातडीने रुख्मिणीबाई रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर या घटनेनंतर संबंधित जेसीबी चालक पळून गेला असून घटनेमुळे संतप्त झालेल्या स्थानिक रहिवाशांनी काही काळ डंपिंगवर कचरा टाकण्यासाठी आलेल्या कचऱ्याच्या गाड्या रोखून धरल्या होत्या.