कल्याण-कसारा तिसऱ्या मार्गाचे काम फास्ट टॅकवर

77

सामना ऑनलाईन । ठाणे

कल्याण ते कसारादरम्यान रखडलेल्या  तिसऱ्या मार्गाचे काम आता फास्ट ट्रकवर सुरू होणार आहे. त्यासाठी  35 हेक्टर एवढी जागा संपादित करावी लागणार असून मोबदला किती द्यावा याचा दर निश्चित करण्यासाठी गुरुवारी एका बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. तिसऱ्या मार्गाचे काम लवकरच सुरू होणार असल्याने मध्य रेल्वे मार्गावरील लाखो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्याशिवाय वाहतुकीचे नियोजनही करणे शक्य होणार आहे.

कल्याण ते कसारा मार्ग टाकण्याच्या कामास 2011 मध्ये मान्यता देण्यात आली. तीन वर्षांत हे काम पूर्ण केले जाणार आहे. पण भूसंपादन  करण्यामध्ये अनेक अडथळे निर्माण झाले.  कल्याण ते कसारा हा 67 किलोमीटरचा मार्ग असून तेथे तिसरी मार्गिका टाकण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर जमीन लागणार आहे. वनखाते, शासकीय तसेच खासगी जमीनही बाधित होत असून एकूण 36 गावांमधील जमिनी घ्याव्या लागणार आहेत. या जमिनींना किती मोबदला द्यावा यावर गेल्या काही महिन्यांपासून वाद सुरू होता.

आज जिल्हाधिकारी कार्यालयात यासंदर्भात रेल्वे, वनखाते व संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत कल्याण-कसारादरम्यान टाकण्यात येणाऱ्या तिसऱ्या मार्गिकेबाबत  चर्चा झाली. त्यात येणाऱ्या अडचणींबाबतही अधिकाऱ्यांनी काही प्रश्न उपस्थित केले. त्यातील बहुतांश प्रश्न मार्गी लागले असून जमिनीच्या मोबदल्याबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी गुरुवारी बैठक होईल. त्यानंतर प्रत्यक्षात कामाला सुरुवात होणार आहे.

शिवसेनेचा पाठपुरावा

कल्याण-कसारा मार्गावरील तिसऱ्या मार्गिकेबाबत शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पाठपुरावा केला होता. तसेच प्रवासी संघाचे पदाधिकारी राजेश घनघाव यांनीही हा प्रश्न मांडला. तिसऱ्या मार्गामुळे  मेल-एक्सप्रेस गाडय़ा तसेच लोकल गाडय़ांची वाहतूक सुरळीत होण्यास  मदत होणार आहे. त्याचा फायदा लाखो प्रवाशांना होईल.

 

आपली प्रतिक्रिया द्या