19 वर्षीय फेरीवाले निघाले दरोडेखोर, 6 जणांना अटक

सामना ऑनलाईन। कल्याण 

मुंबईहून गोरखपूरला जाणाऱ्या कुशीनगर एक्स्प्रेसमध्ये कल्याण-कसाऱ्या दरम्यान दरोडा टाकून प्रवाशांना लुटले होतं. 19 ऑगस्ट रोजी टाकलेलया या सशत्र दरोड्या प्रकरणी कल्याण रेल्वे पोलिसांनी इगतपुरीहून सहा दरोडेखोरांना बेड्या ठोकल्या आहेत. विशेष म्हणजे सर्व आरोपी इगतपुरी रेल्वे स्थानकातील फेरीवाले असून त्यांचे वय अवघं 19 वर्ष आहे.

19 ऑगस्ट रोजी कुशीनगर एक्स्प्रेस कल्याण स्थानकातून सुटल्यानंतर रात्री पावणेबारा वाजण्याच्या सुमारास सात सशत्र दरोडेखोरांच्या टोळीने जनरल डब्यात धुमाकूळ घातला होता. कोयता आणि सुऱ्याच्या धाकावर दरोडेखोरांनी गाडीतीत प्रवाशांचे दागिने, मोबाईल फोन्स आणि रोख रक्कम लुटली. त्यानंतर कसारा रेल्वे स्थानक येताच दरोडेखोर गाडीतून उड्या मारून पसार झाले. या प्रकरणी कल्याण रेल्वे पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत इगतपुरीहून सातपैकी सहा दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या आहोत. सायमन पॅट्रिक मॅन्युएल उर्फ पापा, समीर मुश्ताक खान उर्फ बाबू, सजमुल सलीम सय्यद उर्फ तैफ, भूषण धोडमल उर्फ मन्या, किशोर गिरी आणि दीपक खरात अशी या अटक केलेल्या दरोडेखोरांची नावं असून हे सर्व जण फक्त 19 वर्षांचे आहेत. विशेष म्हणजे सर्व आरोपी इगतपुरी रेल्वे स्थानकात फेरीवाले आहेत.

दरम्यान, पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींकडून लुटमारीच्या वेळी वापरलेले कोयते, प्रवाशांकडून लुटलेले दागिने, मोबाईल फोन्स आणि रोख रक्कम जप्त केली आहे. तसेच या प्रकरणातील आणखी एक आरोपी फरार असून कल्याण रेल्वे पोलीस त्याचा शोध घेत आहेत.