कल्याणचे दहशतवादी कनेक्शन : अब तक पाँच, युसूफ शेखही ‘इसिस’मध्ये

सामना प्रतिनिधी, कल्याण

दहशतवाद्यांचा क्रूर चेहरा असलेल्या इसिसमध्ये कल्याणचे चार तरुण याआधीच सामील झाल्याचे उघड झाले असतानाच आता बैलबाजार येथे राहणारा आणखी एक तरुण सिरीयात जाऊन इसिसला मिळाल्याची धक्कादायक बातमी उघड झाली आहे. युसूफ शेख असे त्याचे नाव असून तो इसिसमध्ये दाखल झाल्याची भीती त्याच्या आईनेच व्यक्त केली असून एटीएसच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे सापडले आहेत.

१ मे २०१४ मध्ये कल्याण पश्चिमेकडील बैलबाजार परिसरात राहणारे आरिफ माजिद, फहाद शेख, सहीम तानकी आणि अमन तांडेल हे चार तरुण इराकमधील इसिस या दहशतवादी संघटनेत सहभागी झाल्याची माहिती दहशतवादविरोधी पथकाला मिळाल्यानंतर कल्याणचे इसिस कनेक्शन उघड झाले होते. आता कल्याणमधील बैलबाजारात राहणारा युसुफ शेखही बेपत्ता झाला असून तो इसिसच्या संपर्कात असल्याचे धागेदोरे एटीएसच्या हाती लागले आहेत.

आंध्रातून फोन आणि हालचाली सुरू !
११ मे २०१६ रोजी युसूफ शेख बेपत्ता झाला. काही दिवसांपूर्वी आंध्र प्रदेशातील नल्लोर येथून युसूफची आई फातिमा यांना फोन आला. तुमचा मुलगा आमच्या ताब्यात असल्याचे कळविण्यात आले. फातिमा हिने पोलिसांनी कळविल्यानंतर पोलीस नल्लोर गावी पोहोचले. संबंधित व्यक्तीने मात्र आपण फोन केलाच नसून माझे काही महत्त्वाचे कागदपत्र हरविले होते. त्या हरविलेल्या कागदपत्रांच्या आधारे अन्य कोणी तरी सीमकार्ड काढून त्याद्वारे हा फोन केला असावा, अशी शंका व्यक्त केली. इथून तपासाला दिशा मिळाली.

काय म्हणते युसूफची आई…
युसूफला नमाज पठणाचे वेड होते. तसेच तो स्क्रिझोफेनिया या मानसिक आजाराने ग्रस्त आहे. तो बेपत्ता होण्यापूर्वी त्याला एका व्यक्तीचा सारखा फोन यायचा. तो बेपत्ता झाल्यानंतर त्याला येणाऱ्या व्यक्तीचे फोन बंद झाले. त्यामुळे तो चुकीच्या मार्गाला तर गेल्याची भीती आम्हाला आहे.

फ्लॅशबॅक
या आधी इसिसमध्ये कल्याणमधील जे चार तरुण सहभागी झाले त्यातील तिघांचा मृत्यू झाल्याची चर्चा आहे. जानेवारी २०१५ मध्ये सहीम तानकी मृत पावल्याची बातमी आली. तीन महिन्यांनी अमन तांडेल हा एका हवाई हल्ल्यात मारला गेल्याची खबर तुर्की देशातून एका अज्ञात व्यक्तीने फोनवरून अमनच्या नातेवाईकांना दिली. त्यानंतर फहाद शेख हाही ठार झाल्याची खबर आली. आरिफ माजीद हाही एका हल्ल्यात मारला गेल्याचे वृत्त आले. मात्र तो मृत झाल्याचे समजून त्याला तेथेच सोडून देण्यात आले होते. ही संधी साधत आरिफने तुर्की गाठले व वडिलांशी संपर्क साधत हिंदुस्थानात परतण्याची इच्छा व्यक्त केली. आरिफच्या वडिलांनी याबाबत एनआयएला माहिती दिली. त्यानंतर सुरक्षा यंत्रणाच्या मदतीने आरिफला पुन्हा हिंदुस्थानात आणण्यात आले. आरिफ सध्या ऑर्थर रोड जेलमध्ये आहे.