कल्याणमध्ये इसिसचा ‘स्लिपर सेल’

सामना ऑनलाईन । कल्याण

इसीस या दहशतवादी संघटनेत कल्याण शहरातील पाच तरुण सहभागी झाल्याच्या बातमीने दोन वर्षांपूर्वी संपूर्ण देश हादरला असताना आता देश पोखरणाऱया या प्रकरणाची पाळेमुळे आणखी खोलवर रुजत असल्याची धक्कादायक माहिती पुढे येत आहे. चार दिवसांपूर्वी मुंबईतून अटक केलेला इसिसचा खतरनाक दहशतवादी अबू जैदने देशातील सहा तरुण इसिसमध्ये सामील होणार असल्याची माहिती तपास यंत्रणांना दिली. या सहा तरुणांमध्ये कल्याणमधील दोघांचा समावेश असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. अबू जैदची जबानी म्हणजे कल्याण शहर इसिसचा ‘स्लिपर सेल’ बनत असल्याची भीती वरिष्ठ पोलीस अधिकाऱयांनीच व्यक्त केली आहे.

१ मे २०१४ मध्ये कल्याण पश्चिमेकडील बैल बाजार परिसरात राहणारे आरिफ माजिद, फहाद शेख, सहीम तानकी आणि अमन तांडेल हे चार तरुण इराकमधील इसिस या दहशतवादी संघटनेत सहभागी झाल्याची माहिती दहशतवादविरोधी पथकाला मिळाली, तर आणखी एक तरुण वर्षभरापासून येथून गायब झाला आहे. त्याचेही इसिस कनेक्शन असल्याची पक्की खबर पोलिसांकडे आहे. सुरक्षा यंत्रणांनी या प्रकरणी तपास सुरू करत या तरुणाचा ब्रेनवॉश कुणी केला? या मागे कोण आहेत? याबाबतची पाळेमुळे खणण्यास सुरुवात केली. असे असतानाच शनिवारी उत्तर प्रदेश दहशतवादविरोधी पथकाने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून इसिसचा दहशतवादी अबू जैदच्या मुसक्या आवळल्या. यावेळी त्याच्या जबानीतून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. हिंदुस्थानातील सहा तरुणांना इसिसमध्ये सहभागी करून घेण्यासाठी दुबईतून आपल्यावर खास जबाबदारी देण्यात आल्याची जबानी त्याने दिली. यात कल्याणमधील दोन तरुण आहेत.

एनआयए, एटीएसची करडी नजर
आधीच कल्याणमधील पाच तरुण इसिसमध्ये सहभागी झाले असताना आता आणखी दोन तरुण दहशतवाद्यांच्या संपर्कात असल्याच्या वृताने सुरक्षा यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या आहेत. कल्याण परिसरातील प्रत्येक हालचालींवर एनआयए, एटीएसची सुरक्षा यंत्रणांची करडी नजर आहे.