कमला मिल अग्निकांड : आरोपींचा पोलीस तपासावर विश्वास नाही!

सामना प्रतिनिधी । मुंबई

सदोष मनुष्यवधाच्या गुन्हा दाखल झाल्यानंतर वन अबव्हचे तीन भागीदार फरार आहेत. त्यांचे कुटुंबीयदेखील पोलिसांना तपासात सहकार्य करीत नाहीत. या तिघांनी वकिलामार्फत गृहमंत्रालयाला पत्र पाठविले असून यामध्ये या घटनेची सीबीआय चौकशी करा, अशी मागणी केली आहे. पोलिसांच्या तपासावर या तिघांनी अविश्वास दाखविला आहे. विशेष म्हणजे पोलीस अटकेची कारवाई करू नयेत यासाठी हे भागीदार दबाव टाकत असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

कमला मिल कंपाऊंडमधील वन अबव्ह आणि मोजो ब्रिस्रो या दोन रेस्टोपबला लागलेल्या आगीत १४ जणांचा मृत्यू झाला तर ५०हून अधिक जखमी झाले. या प्रकरणी वन अबव्हचे मालक आणि व्यवस्थापक अशा पाच जणांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तर बेकायदा बांधकामप्रकरणी कमला मिलचा मालक रमेश गोवानी याच्यासह तिघांवर एमआरटीपी कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच प्रकरणात गोवानी याला चौकशीसाठी समन्स धाडण्यात आले आहे. सदोष मनुष्यवधाच्या गुह्यातही गोवानी याची चौकशी करण्यात येणार आहे.

चोराच्या उलट्या बोंबा
प्राथमिक तपासामध्ये आग वन अबव्ह या पबमध्ये लागली. मात्र वन अबव्हचे मालक आग मोजो बिस्रोमध्ये लागल्याचा दावा करीत आहेत. मात्र त्यांची ही बोंब म्हणजे चोराच्या उलटय़ा बोंबा असल्याचे म्हटले जात आहे. या दुघटनेतील जखमी आणि साक्षीदारांनी दिलेल्या माहितीनुसार ते सर्व वन अबव्हमध्येच बसल्याचे म्हटले आहे. तर दुसरीकडे या दोन्ही रेस्टोपबची रचना पाहिल्यास मोजोतील ग्राहक लपण्यासाठी वन अबव्हमध्ये येणे शक्यच नसल्याचे दिसून येते.

छप्पर, दरवाजात कापूस आणि स्पंज
दोन्ही रेस्टोपबने म्युझिकचा आवाज बाहेर जाऊ नये यासाठी दरवाजे आणि छप्पर यामध्ये स्पंज आणि कापसाचा वापर केला होता. यामुळे ही आग अल्पावधीत भडकली आणि आतील लोकांना बाहेर पडता आले नाही. तपासामध्ये ही माहिती पुढे येत असली तरी आगीचे नेमके कारण अग्निशमन दलाच्या अहवालानंतरच स्पष्ट होईल, असे पोलीस सूत्रांनी म्हटले आहे.

युग पाठकची चौकशी
कमला मिल प्रकरणातील आरोपी पोलिसांपासून दूर पळत असताना माजी पोलीस आयुक्त के. के. पाठक यांचा मुलगा आणि मोजो ब्रिस्टोचा भागीदार युग पाठक मात्र चौकशीत सहकार्य करीत आहेत. ना. म. जोशी मार्ग पोलिसांनी युग पाठकची चौकशी करून यासंदर्भात त्याचा जबाब नोंदवून घेतला. पाठक यांनीही आग ही वन अबव्ह येथेच लागली. आम्ही तर सर्व ग्राहकांना सुरक्षित बाहेर काढल्याचे जबाबात म्हटले, असे सूत्रांनी सांगितले.

‘स्मॅश’लाही दणका
उच्च न्यायालयाने ‘स्मॅश एण्टरटेन्मेंट’ या कंपनीलाही आज दणका दिला. कमला मिलमध्ये उभारलेल्या स्पोर्ट्स बार, पार्टी हॉल आणि गो कार्टिंग ट्रकवर कारवाईस महानगरपालिकेला मनाई करावी अशी या कंपनीची मागणी न्यायालयाने फेटाळून लावली. पालिकेच्या मंजुरीनेच ही बांधकामे झाल्याचा दावा कंपनीने केला. परंतु त्यासंदर्भातील कागदपत्रे त्यांना सादर करता आली नाहीत. न्यायमूर्ती संदीप शिंदे यांनी कंपनीची याचिका ८ जानेवारीपर्यंत तहकूब केली.