कमला मिल अग्निकांड;चौकशी अहवाल हायकोर्टात सादर

सामना ऑनलाईन, मुंबई

कमला मिल अग्नितांडवाच्या चौकशीकरिता राज्य सरकारकडून त्रिसदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली आहे.  10 सप्टेंबरपर्यंत या प्रकरणाचा अहवाल सादर करण्याचे आदेश हायकोर्टाने गेल्या सुनावणीवेळी या समितीला दिले होते. त्यानुसार न्यायमूर्ती भूषण गवई आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठासमोर आज चौकशी समितीने त्याबाबतचा अहवाल आज कोर्टासमोर सादर केला. न्यायालयाने या अहवालाची प्रत पालिकेला देण्याचे आदेश दिले.

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये कमला मिल येथील  मोजोस बिस्त्रो आणि वन अबव्ह या रेस्टॉरंटना लागलेल्या आगीत 14 जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले. या आगीची चौकशी व्हावी याकरिता राज्य सरकारकडून त्रिसदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली. केरळचे माजी मुख्य न्यायमूर्ती ए. व्ही. सावंत, वास्तुविशारद वसंत ठाकूर, नगरविकास विभागाचे माजी मुख्य सचिव के. नलिनाक्षन आदी सदस्यांचा या समितीत समावेश आहे. 10 सप्टेंबरपर्यंत चौकशी समितीला अहवाल सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यानुसार आज अहवाल सादर करण्यात आला.