Kangana Ranautचा ‘फिल्मी सेल्फी’, स्वत:वरच चित्रपट काढणार

2

सामना ऑनलाईन । मुंबई

अभिनेत्री कंगना रनौत हिचा ‘मनिकर्णिका’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला. मणिकर्णिका या चित्रपटाचे दिग्दर्शन देखील कंगनाने केले आहे. या चित्रपटानंतर आता कंगना स्वत:च्या आयुष्यावरील चित्रपट दिग्दर्शित करणार आहे. बाहुबली या चित्रपटाचे दोन्ही भाग लिहणारे लेखक के व्ही विजयेंद्र प्रसाद हे कंगनाच्या आयुष्यावरील चित्रपटाची कथा सध्या लिहित असून येत्या ऑक्टोबर नंतर या चित्रपटाच्या शूटींगला सुरुवात होणार आहे.

कंगनाने स्वत: या चित्रपटाच्या बातमीला दुजोरा दिला आहे. ‘माझ्या आयुष्यात खूप चढ उतार आले. मी एका छोट्याश्या शहरातून मुंबईत आले. बॉलीवूडमध्ये कुणीही गॉडफादर नसताना मी यशस्वी झाले. मला तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे माझ्या मणिकर्णिका या चित्रपटाचे लेखक के व्ही विजयेंद्र प्रसाद यांनी ते माझ्या जीवनावर चित्रपट लिहण्यास उत्सुक असल्याचे सांगितले. मात्र सुरुवातीला मला फार अवघडल्यासारखे झाले. मात्र नंतर त्यांची इच्छा बघून मी होकार कळवला. या चित्रपटाचे दिग्दर्शन मी स्वत: करणार आहे’, असे कंगनाने सांगितले.

कंगनाचे बॉलीवूडमध्ये अनेक कलाकारांसोबत वाद झाले. कंगनाने बॉलिवूडमधील घराणेशाहीवर देखील टीका केली होती. कंगनाचे आदित्य पंचोली, हृतिक रोशन, अध्ययन सुमनस, करण जोहर यांच्यासोबतचे वाद चव्हाट्यावर आले. त्यामुळे कंगनाच्या चित्रपटात त्यांची भूमिका कोण साकारणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. ‘माझा हा प्रवास या सर्व लोकांसोबतच होता. त्यामुळे त्यांच्या भूमिका चित्रपटात असणारच. पण आम्ही कुणाचेही नाव घेणार नाही. मला माझे आयुष्य या चित्रपटातून दाखवायचे आहे. हा एका यशस्वी मुलीचा प्रवास असणार आहे.’असे कंगनाने सांगितले.