‘अच्छे दिन’ ही निव्वळ अफवा- कन्हैयाकुमार


सामना प्रतिनिधी । परभणी

परभणीत शुक्रवारी एका जाहिर सभेत कन्हैय्याकुमार याने भाजप सरकार विरोधात जोरदार हल्लाबोल केला.”भाजपने राम मंदिराच्या नावावर दिल्ली काबीज केली आहे. अच्छे दिनचा नारा देऊन दिशाभूल केली असून अच्छे दिन ही एक निव्वळ अफवा आहे. या अफवेवर विश्वास ठेऊ नका”, असे जाहीर आवाहन त्याने केले.

परभणी शहरातील ज्ञानोपासक महाविद्यालयाच्या प्रांगणावर कन्हैयाच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते त्यात कन्हैय्या बोलत होता. “सद्यास्थितीत देशात भय व दहशतीचे वातावरण आहे. संवैधानिक मूल्यांची हत्या केली जात आहे. तसेच महाराष्ट्रात नरेंद्र दाभोलकर, कॉ.गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले नाही”. मात्र आता कर्नाटकमध्ये कारवाई होत असल्याने तेथील पोलीस महाराष्ट्रात येऊन कारवाई करतील या भीतीने लोकांना संभ्रमित करण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून ही कारवाई सुरु असल्याचा आरोपही यावेळी कन्हैय्याकुमार याने केला.