चहा विकण्याच्या नावावर देश विकण्याची तयारी – कन्हैय्या कुमार

सामना प्रतिनिधी । संगमनेर

भाजप ‘गरिबी हटाव’चा नारा देत सत्तेवर विराजमान झाले आहे. जनतेने त्यांना मोठ्या आशेने निवडून दिले; परंतु हे जातीवाद करणारे सरकार असून, व्यक्तिस्वातंत्र्यावर गदा आणण्याचे काम सुरू आहे. ज्या संविधानावर देश चालतो, त्या संविधानाला हे जुमानत नसल्याचे दिसून येत असल्याची टीका विद्यार्थी नेता कन्हैय्या कुमार यांनी केली आहे. दरम्यान, चहा विकण्याच्या नावावर आज देश विकण्याची तयारी सुरू असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

कॉ. दत्ता देशमुख यांच्या शताब्दी वर्ष आणि २३व्या स्मृतिदिनानिमित्त आज संगमनेरमध्ये आयोजित व्याख्यानात कन्हैय्या कुमार बोलत होते. यावेळी आमदार बाळासाहेब थोरात, आमदार सुधीर तांबे, कॉ. भालचंद्र कांगो, कॉ. मिलिंद रानडे, एम. व्ही. जोगळेकर, मोहन देशमुख आदी उपस्थित होते.

कन्हैय्या कुमार म्हणाले, या देशाला सावरकरांचा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा वारसा आहे. मात्र, संविधानाला न मानणारे, संविधान तयार करणाऱयांचा अपमान करण्याचे काम सध्या सुरू आहे. धर्माच्या नावावर अराजकता पसरवून दंगली माजविणारे नकली हिंदूभक्तांना यापुढील २०१९च्या लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत पराजित करावयाचे आहे. गरीब, मजूर, शेतकरी यांच्या प्रश्नांना या सरकारने बगल दिली आहे. नोटाबंदी, जीएसटीने जनसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. देशात महागाई वाढली असून, मजूर, शेतकरी, आत्महत्या करीत आहेत. धर्माच्या नावावर धंदा करणाऱया लोकांना गुजरात निवडणुकीत सर्व भाजपविरोधी पक्षांनी एकत्रित लढून पराभूत केले पाहिजे, असेही ते म्हणाले.