युवीला निरोपाचा सामना मिळायला हवा होता, माजी कर्णधाराने व्यक्त केली नाराजी

96

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

टीम इंडियाचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू युवराज सिंह याला मैदानावर निरोप मिळायला हवा होता, असे स्पष्ट मत 1983 च्या विजयी विश्वचषक संघाचे कर्णधार आणि अष्टपैलू खेळाडू कपिल देव यांनी व्यक्त केले आहे. यासह युवराजला माझ्या सर्वोत्तम 11 खेळाडूंमध्ये स्थान देईल असेही कपिल देव म्हणाले.

‘फायटर’ युवराजची निवृत्ती,  कॅन्सरग्रस्तांच्या सेवेसाठी आयुष्य खर्च करणार

युवराह सिंह याने सोमवारी पत्रकार परिषद घेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. गेल्या दोन वर्षापासून तो संघाबाहेर होता. निवृत्तीची घोषणा केल्यानंतर जगभरातील खेळाडूंनी त्याला भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. कपिल देव यांनीही शुभेच्छा देताना म्हटले की, ‘युवराज सिंह हा जबरदस्त क्रिकेटपटू आहे. मी हिंदुस्थानच्या सर्वोत्तम 11 खेळाडूंचा संघ बनवेल तेव्हा त्याचा संघात नक्कीच समावेश करेल.’

युवराज सिंह सारख्या खेळाडूला मैदानावर निरोप मिळायला हवा होता. मला ते पाहायला आवडले असते कारण त्याने शानदार खेळ केलेला आहे. देशात युवराज सारखे लीडर हवेत कारण येणारी पिढी त्याला आदर्श मानते. त्याने कारकीर्दीमध्ये जे यश मिळवले आहे त्यासाठी त्याला शुभेच्छा, असे कपिल देव म्हणाले.

युवराजची कामगिरी –

  • 304 एक दिवसीय लढतीत 14 शतक आणि 52 अर्धशतकांच्या मदतीने 8701 धावा आणि 111 बळी
  • 40 कसोटीत 3 शतक आणि 11 अर्धशतकांच्या मदतीने 1900 धावा आणि 9 बळी
  • 58 टी-20 लढतीत 1177 धावा आणि 28 बळी
आपली प्रतिक्रिया द्या