विराटला नक्कीच सूर सापडेल, माजी कर्णधार कपिलदेवला विश्वास

सामना ऑनलाईन, मुंबई

यंदाच्या दहाव्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत हिंदुस्थानी कर्णधार विराट कोहलीला अपयशाचा सामना करावा लागला म्हणून चिंता करू नका. कोहलीसारखा महान फलंदाज कधीही उसळी घेऊन शानदार कामगिरी करू शकतो. १ जूनपासून सुरू होणाऱ्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत तुम्हाला नेहमीचा धडाकेबाज विराट पाहायला मिळेल, असा ठाम विश्वास हिंदुस्थानला विश्वचषक जिंकून देणारा महान कर्णधार व माजी अष्टपैलू क्रिकेटपटू कपिलदेव याने व्यक्त केलाय.

एका इंग्रजी टी.व्ही. वाहिनीने आयोजिलेल्या चर्चासत्रात कपिलदेव याने विराटच्या क्षमतेवर स्तुतिसुमने उधळली. कपिलदेव म्हणाला, विराट कोहलीच्या फलंदाजीच्या तुफानी क्षमतेवर शंका घ्यायलाच नको. आयपीएलच्या बॅडपॅचमधून तो नक्कीच बाहेर येईल. एकदा का त्याची बॅट धावा ओकू लागली की टीम इंडियाचे अन्य फलंदाजही तुफान खेळतील. कारण कर्णधाराने स्वतः खेळून संघ सहकाऱ्यांना प्रेरणा द्यायची असते याची चांगलीच जाण विराटला आहे. कोहली हा टीम इंडियाचा बहुमूल्य खेळाडू आहे हे विसरून चालणार नाही.

धोनी, युवराजचा समावेश आनंददायक
माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि धडाकेबाज फलंदाज युवराज सिंग या अनुभवी स्टार खेळाडूंचा हिंदुस्थानी संघातील समावेश आनंददायकच आहे. कारण या दोन्ही जिगरबाज क्रिकेटपटूंचा खेळ टीम इंडियाला मोठे यश मिळवून देणारा ठरेल असा विश्वासही कपिलने व्यक्त केला.

पाकिस्तानविरुद्ध खेळताना बेसावध राहू नका
टीम इंडियाची सलामीची चॅम्पियन ट्रॉफी लढत ४ जूनला परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे. पाकिस्तान हा या स्पर्धेतील ‘अंडरडॉग’ गणला जाणारा संघ आहे याचे भान ठेवून हिंदुस्थानी क्रिकेटपटूंनी या पहिल्या लढतीत मुळीच बेसावध राहू नये. कारण पाकिस्तानी संघ आपल्याविरुद्ध खेळताना जीव तोडून खेळतो असा सल्लाही कपिलदेवने टीम इंडियाला दिला.

कागदावर हिंदुस्थानी संघ बलवान
कागदावर टीम इंडिया बलवान व समतोल संघ वाटतोय असे सांगून कपिल म्हणाला, फलंदाजीत अजिंक्य रहाणे, शिखर धवन, युवराज सिंग, कर्णधार विराट कोहली, रोहित शर्मासारखे ‘स्टार’ खेळाडू संघाला मोठे यश मिळवून देऊ शकतात, तर गोलंदाजीत मोहम्मद शमी, उमेश यादव, भुवनेश्वर कुमार, रवीचंद्रन अश्विन व रवींद्र जाडेजासारखे सुपरस्टार संघाच्या यशात मोलाचा वाटा उचलू शकतात. त्यामुळे आता मागे पाहू नका. यशाच्या मार्गावर चालण्यासाठी परिश्रम करा असा वडीलकीचा सल्लाही ५८ वर्षीय लिजेंड कपिलदेवने दिला.