करंजा मच्छिमार बंदराचे काम लवकरच मार्गी लागणार

1

सामना ऑनलाईन । न्हावाशेवा 

मुंबईतील ससून डॉकला पर्याय म्हणून रायगड जिल्ह्य़ातील करंजा येथे मासेमारी बंदर विकसित करण्यात येणार आहे. या बंदराच्या कामाला येत्या डिसेंबर महिन्यापासून सुरूवात होणार आहे. या बंदराच्या कामासाठी 149.80 कोटी रूपयांची प्रशासकीय आणि तांत्रिक मान्यता मिळाली आहे. डिसेंबर पुर्वी या कामाचे टेंडर निघून कामाला सुरूवात होणार आहे. या बंदरामुळे येथिल 10 हजार लोकांना रोजगार मिळणार आहे. या बंदरामुळे ससून डॉकवरील ओझे कमी होणार असून रायगड जिल्ह्यातील मच्छिमारांना हे बंदर सोयिस्कर होणार आहे.

 या बंदराचे काम यापूर्वी नोहेंबर २०१२ पासून सुरू करण्यात आले होते मात्र येथे खडक लागल्याने आणि निधी कमी असल्याने हे काम  रखडले होते. या योजनेंतर्गत करंजा येथे चारशे पंचाहत्तर मीटर लांबीच्या ब्रेक वॉटर बंधारा, आरसीसी जेट्टी, बोटीमंध्ये डिझेल आणि बर्फ भरण्याची व्यवस्था, 1 हजार 22 मीटरचे रेबिटमेंट, स्लोपिंग हार्ड, अंतर्गत रस्ते, वाहनतळ, मासे उतरवण्याचा धक्का, प्रशासकीय इमारत, रेडिओ कम्युनिकेशन सेंटर, गीअर शेड, जाळे विणण्याची शेड, फिश र्मचट डॉम्रेटरी, प्रसाधनगृह आणि कुंपणाचे काम करण्यात येणार आहे. करंजा येथील या मासेमारी बंदराच्या विकासकामाला कृषी विभागाकडून 2011 ला मंजुरी देण्यात आली. यानंतर 2 नोव्हेंबर 2012 ला बंदराच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. जेट्टीच्या कामादरम्यान गाळ काढताना खडक लागल्याने आणि हा खडक फोडण्यासाठी जास्त निधी लागत असल्यामुळे हे बंदर विकासाचे काम रखडले होते. मात्र नंतर हा प्रकल्प दीडशे कोटींच्या घरात गेला.

प्रकल्पाला केंद्र सरकार आणि राज्य सरकार 50-50 टक्के अर्थ सहाय्य करणार आहे. आत्ता केंद्र सरकारने व राज्य सरकारने या बंदरासाठी निधी देण्याची तयारी दर्शविल्यामुळे येत्या दोन वर्षात डिसेंबर 2020 पर्यंत हे बंदर सूरू होईल असे महाराष्ट्र मेरीटाईम मंडळाचे कार्यकारी अभियंता सुधिर देवरे यांनी सांगितले. पूर्वी या बंदराचे काम किनारे विभागाकडे होते आत्ता ते मेरीटाईम मंडळाकडे सोपविण्यात आले आहे.

कोकणातील मासेमारी व्यवसायासाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा आहे. रायगड जिल्ह्यात हे बंदर झाल्यास रायगड  जिल्ह्यातील मच्छिमारांना हे बदर व्यापारासाठी सोयीस्कर होणार आहे. उरण तालुक्यातील करंजा, मोरा, दिघोडे,आवरा, हनुमान कोळीवाडा येथे अनेक मच्छिमार नौका आहेत. तसेच रायगड जिल्ह्यातील अलिबाग, मुरूड, श्रीवर्धन आदी ठिकाणीही मोठ्या प्रमाणात मच्छिमारी केली जाते. करंजा येथिल बंदर झाल्यास या मच्छिमारांना ते जवळचे व सोयीस्कर ठरणार आहे. या बंदरामुळे मुंबईच्या ससून डॉक वरचाही भार कमी होणार आहे.  करंजा येथे सुसज्ज मासेमारी बंदर झाल्यास रायगड जिल्ह्यातील मच्छीमारांना हक्काचे बंदर मिळेल यासाठी हे बंदर लवकरात लवकर पुर्ण व्हावे अशी मच्छिमारांची मागणी आहे.