राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघर्षयात्रेसाठी कर्जतमध्ये नागरिकांवर दडपशाही?


सामना ऑनलाईन, कर्जत

सत्ता परिवर्तनासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने संघर्ष यात्रेला सुरुवात केली आहे. महाडनंतर ही यात्रा कर्जतला आली असून त्यांचे इथल्या रॅडीसन ब्ल्यू या आलिशान हॉटेलमध्ये मंथन होणार आहे. मात्र त्यांच्या या संघर्ष यात्रेचा कर्जतमधल्या इंदिरानगर भागात राहणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचं इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे. इथल्या नागरिकांचा हक्काच्या आणि अधिकृत निवाऱ्यासाठी आणि इतर मागण्यांसाठी १९८४ सालापासून संघर्ष सुरू आहे. या लढ्याला यश येत नसल्याने इथल्या नागरिकांनी २७ जानेवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचे ठरवले आहे. मागण्या पूर्ण होत नसल्याचा निषेध करण्यासाठी इथल्या नागरिकांनी घरावर काळे झेंडे आणि निषेधाचे फलक लावण्याची परवानगी मागितली होती. ही परवानगी नाकारण्यात आली असून फलक किंवा झेंडे लावल्यास गुन्हे दाखल करण्याची कर्जतच्या मुख्याधिकाऱ्यांनी धमकी दिल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

कर्जतमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुरेश लाड निवडून आलेले आहेत.  इंदिरा नगर हा भाग रॅडिसन ब्ल्यू हॉटेलला जाणाऱ्या रस्त्यावर येतो. जर या नागरिकांनी निषेधाचे फलक लावले किंवा घरावर काळे झेंडे उभारले तर तो राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना आणि लाड यांना विरोध होईल अशा भीतीपोटी ही परवानगी नाकारल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. कारण कोणतेही असो घटनेच्या चौकटीत राहून निषेध नोंदवण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. असं असताना या नागरिकांवर प्रशासनाकडून दडपशाही का केली जात आहे हा प्रश्न इंदिरानगरच्या रहिवाशांना पडला आहे.