पाण्यासाठी हंडा, बादल्या, पातेल्यांची विहिरीवर ‘झुंबड’

27
छाया - ज्योती जाधव

सामना प्रतिनिधी । कर्जत

टंचाईग्रस्त गावांच्या कृती आराखडय़ात कर्जत तालुक्यातील खारबाच्या वाडीचा समावेश करण्यात आला आहे. यासाठी लाखो रुपयांचा निधीही मंजूर केला. मात्र पाण्यावाचून तडफडणाऱया अनेक गावांपर्यंत या आराखडय़ाचे ‘पाट’ पोहोचलेच नसल्याचे खारबाच्या वाडीतील भीषण परिस्थितीवरून समोर आले आहे. सुदैवाने मध्येच एखादा टँकर गावात आलाच तर आपल्या कच्च्याबच्च्यांसह गावकऱयांची झुंबडच विहिरीवर उडते. पुन्हा लवकर पाणी मिळेल की नाही या भीतीने आया-बहिणी घरातील हंडा, कळशा, बादल्या, पातेली इतकेच नाही तर तेल, कलरचे रिकामे झालेले डबे घेऊन ‘आडा’च्या भोवताली तळ ठोकतात. मुंबई-ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कर्जत तालुक्यातील खारबाच्या वाडीतील हे भयंकर वास्तव आहे.

निधी ‘अडवा’ खिशात ‘जिरवा’
कृती आराखडय़ांसाठी दरवर्षी शासन कोटय़वधी रुपयांचा खर्च करते. प्रत्यक्षात टंचाईग्रस्त गावांमध्ये टँकर पोहोचतच नसल्याचे खारबाची वाडीवरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे टंचाईग्रस्त गावांची तहान भागवण्यासाठी मंजूर झालेला निधी ‘अडवून’ नेमका कुणाच्या खिशात ‘जिरवला’ असा सवाल कर्जतवासीयांनी विचारला आहे. दरम्यान कृती आराखडय़ात समावेश करूनही ज्या गावांना पाणी मिळत नाही अशा ठिकाणी ठाण्याची श्री केतेश्वर सामाजिक संस्था टँकरने पाणी पुरवत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या