सॉरी ब्रो, यालाच म्हणतात कर्म; पाकिस्तानच्या पराभवानंतर शमीचे शोएब अख्तरला उत्तर

टी-20  विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात रविवारी इंग्लंडने पाकिस्तानचा 5 विकेट्सनी धुव्वा उडवत दुसऱ्यांदा हा विश्वचषक जिंकला. गोऱ्या साहेबांच्या संघाने वन डेतही वर्ल्ड चॅम्पियनशिप पुरस्कार पटकावला आहे. मात्र पाकिस्तानच्या पराभवानंतर टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याने हिंदुस्थानी गोलंदाज सरासरीच आहेत असे टीम इंडियाच्या जखमेवर मीठ चोळणाऱ्या माजी पाकिस्तानी गोलंदाज शोएब अख्तर याला जशास तसे प्रत्युत्तर दिले आहे.

फायनलमध्य पराभव झाल्यानंतर पाकचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने सोशल मीडियावर तुटलेल्या हृदयाच्या इमोजीसह रिएक्ट केले. त्यावर हिंदुस्थानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने उपरोधिक टीका केली. शमी, शोएबला टॅग करत म्हणाला की – सॉरी ब्रदर. यालाच कर्म म्हणतात. गुरुवारी टीम इंडियाचा सेमीफायनलमध्ये इंग्लंडविरोधात 10 विकेट्सनी पराभव झाल्यानंतर शोएब अख्तरने हिंदुस्थानी  गोलंदाज सरासरी असल्याचे विधान केले होते. शोएब म्हणाला होता की, टीम इंडियाचा अत्यंत वाईट पद्धतीने पराभव झाला. तुमचा संघ विजयाच्या लायकीचा नव्हता.