कर्मयोगी

73

नमिता वारणकर

स्वसंरक्षणाचे तंत्रशुद्ध धडे अरण्यातील मुलींना विनामूल्य देणारा शिवशंकर गेडेकर… निष्काम कर्मयोगाचे मूर्तिमंत उदाहरण…

मार्शल आर्ट, वुशू मार्शल आर्ट, योगा यामध्ये आता जंगल भागात राहणाऱया मुलीही तरबेज होऊ लागल्या आहेत. या मुली दररोज न चुकता १५० दंड-बैठका मारतात. गरीब कुटुंबात वाढलेल्या या मुलींना आवड असूनही पैशाअभावी हे प्रशिक्षण घेता येत नाही, मात्र आता शिवशंकर गेडेकर या प्रशिक्षकाच्या माध्यमातून ही संधी त्यांना विनामूल्य मिळत आहे.

अभयारण्यात पर्यटक मार्गदर्शक म्हणून काम करणाऱया शिवशंकरचा जन्म उमरेड-पवनी-करांडला अभयारण्यालगत असलेल्या जंगल भागातच झाला. गावातील मुला-मुलींना योगा आणि कराटेचं प्रशिक्षण देण्याविषयी सांगतो, माझे कराटेतील शेरदिल मडावी यांच्याकडून मी ३ वर्षे कराटेचे प्रशिक्षण घेतले. त्यासाठी पहाटे ४ वाजता उठून कराटे क्लासला जायचो. त्या वेळी असणारी महिना ३० रुपये फीही मला परवडणारी नव्हती. तेव्हा आई मला रोज एक रुपया द्यायची आणि मी ते माठात साठवून ठेवायचो आणि महिनाभराने सरांना हे साठलेले पैसे द्यायचो. एक दिवस त्यांनी मला या सुटय़ा पैशांविषयी विचारले. तेव्हा मी त्यांना साठवलेल्या पैशांमधून तुमची फी भरतो असे सांगितले. तेव्हापासून त्यांनी माझी फी नाकारली आणि ते मला विनामूल्य शिकवू लागले. त्यानंतरचे शिक्षण परवडणारे नसल्याने सर्व प्रशिक्षण मी स्वतःचे स्वतःच घरी शिकलो. म्हणून गावातील माझ्याकडे शिकणाऱया मुला-मुलींकडूनही आमच्या गावातील मुलांनाच राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्याची इच्छा होती. त्यानुसार सुरुवातीला ३१ मुला-मुलींना या स्पर्धेसाठी तयार केलं. त्या सर्वांनाच पदक मिळालं. तेव्हा लक्षात आलं की, आपल्याकडची मुलं अशा प्रशिक्षणामध्ये प्रगती करू शकतात. सध्या योगा आणि ओशू मार्शल आर्ट हे शालेय खेळ आहेत. याची फीही जास्त असते. गावातील मुलांना फी भरणं शक्य नसतं. म्हणून ज्यांना आवड आहे त्यांना विनामूल्य शिकवायला सुरुवात केली.

शिवशंकरकडे शिकायला येणारे विद्यार्थी दररोज २ सूर्यनमस्कारांची वाढ करतात. येथील मुली दररोज ८० सूर्यनमस्कार घालतात. एक मुलगी रोज १५० डिप्स मारते. एका मिनिटाला एक आसन पूर्ण करतात. सकाळी ५ वाजल्यापासून मुली सरावासाठी येतात. प्रत्येक मुलीने ३-३ वेळा राष्ट्रीय स्पर्धेत पदक मिळवले आहे. गावातील मुला-मुलींचा प्रतिसादही छान मिळतो.

शासनाकडून मदतीची अपेक्षा

ग्रामीण भागातील मुला-मुलींनाही राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धेत यश मिळायला हवे. यासाठी त्यांना पोषाख, खेळाचे साहित्य मिळायला हवे. त्यामुळे त्यांच्या भविष्याची पुढची वाटचालही सुस्थितीत होईल. पुरेसे आणि दर्जेदार सामान नसल्यामुळे मुले मागे पडतात, असे व्हायला नको यासाठी शासनाकडे तो मदतीची अपेक्षा व्यक्त करतो.

 

आपली प्रतिक्रिया द्या