एकेकाळचा चहा विक्रेता आता ३२२ कोटींचा मालक

सामना ऑनलाईन । बंगळुरु

कर्नाटक विधानसभा निवडणुकींचे बिगुल असून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. निवडणुकीसाठी अर्ज भरणाऱ्या उमेदवारांमध्ये करोडपती उमेदवारांची संख्या मोठी आहे. सर्वच पक्षांनी करोडपतींना उमेदवारी दिली असून काही अपक्ष उमेदवाराही करोडपती आहेत. या निवडणुकीसाठी अर्ज भरलेला एक अपक्ष उमेदवार सध्या संपूर्ण कर्नाटकात चर्चेचा विषय बनला आहे. याचे कारणही तसेच खास आहे कारण एकेकाळी चहा विक्रेता असलेल्या या उमेदवाराने आपण ३२२ कोटींचा मालक असल्याचे जाहीर केले आहे.

डॉ. पी. अनिल कुमार असे या उमेदवाराचे नाव आहे. ही संपत्ती मिळवण्यासाठी आपण कठोर परिश्रम केल्याचा दावा कुमार यांनी केलाय. ‘हॉटेलमध्ये भांडी घासणे, चहा विकणे ही सारी कामे मी केली आहेत. माझी आई लोकांच्या घरची कामे करत होती. त्यातून तिला चार इडल्या खाण्यासाठी मिळत होत्या. पण आधी ती आम्हाला खाऊ घालत असे.’, अशी आठवणही कुमार यांनी सांगितली.

कर्नाटकात आयटी क्षेत्राला बुस्ट मिळवल्यानंतर कुमार यांचा चहा व्यवसायही तेजीत आला. या व्यवसायात मिळालेले उत्पन्नाची त्यांनी रियल इस्टेटमध्ये गुंतवणूक केली. कुमार यांच्या मालकीच्या जमिनीचाही भाव वाढल्याने त्यांची परिस्थिती खऱ्या अर्थाने बदलली. बोमनहळ्ळी मतदारसंघातून कुमार हे यंदा निवडणूक लढवणार आहेत.