मोदीजी, गोध्रा हत्याकांडात किती मारले गेले सांगा!

सामना ऑनलाईन, बंगळुरू

मोदीजी, गुजरातमधील तुमच्या राजवटीतील गोध्राकांडात किती लोक मारले गेले ते आधी सांगा, अशा शब्दांत काँग्रेसचे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आज मोदींवर तुफानी हल्ला चढवला. भाजपची सत्ता जिथे जिथे आहे तिथे अल्पसंख्याकांना सुरक्षितता मुळीच नाही, असा आरोपही त्यांनी केला.

कर्नाटकात विधानसभेची निवडणूक लवकरच होणार आहे. त्या दृष्टीने मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी आतापासूनच तेथील सिद्धरामय्या यांच्या सरकारविरोधात आगपाखड सुरू केली आहे. मोदी यांनी कर्नाटकातील काँग्रेस सरकारची संभावना १० टक्के कमिशनचे सरकार अशी करतानाच ‘काँग्रेसमुक्त’ सरकारचा आग्रह धरला होता.

त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आधी ट्विटरवरून आणि नंतर पत्रकार परिषद घेऊन मोदी यांच्यावर तोफ डागली.

मोदी-शहा हे खोटे बोलण्यात पटाईत आहेत. त्यांनी कर्नाटकबद्दल खोटय़ा गोष्टी पसरवून कानडी जनतेच्या अभिमानावर आघात केला आहे, असा आरोप सिद्धरामय्या यांनी केला. मोदी-भाजप यांनी खोटारडेपणाचा आश्रय न घेता वस्तुस्थिती आणि नीती मर्यादांची बूज राखून निवडणूक लढवावी, असा टोलाही त्यांनी लगावला.

सिद्धरामय्या काय म्हणाले?

  • नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये मुख्यमंत्री असताना तब्बल नऊ वर्षे ‘लोकपाल’ची नियुक्ती होऊ दिली नव्हती.
  •  भाजप अध्यक्ष अमित शहा हे खुनाच्या प्रकरणात अडकले होते.
  • तुरुंगवास भोगून आलेल्या माणसाला त्यांनी कर्नाटकात मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित केले आहे.
  •  भाजपची सत्ता असताना २००८ ते २०१३ या पाच वर्षांत तीन मुख्यमंत्री मिळालेले कर्नाटक हे दक्षिण हिंदुस्थानात पहिले राज्य ठरले.
  • मोदी भ्रष्टाचाराला हातभार लावत असतात. त्यांना ‘लोकपाल’वर बोलण्याचा काय नैतिक अधिकार आहे? नैतिकदृष्टय़ा तर ते पंतप्रधान बनण्यासही योग्य नाहीत.