कर्नाटकसाठी सिद्धरामय्या सरकारचा स्वतंत्र झेंडा तयार

सामना ऑनलाईन । बंगळुरू

विधानसभेची निवडणूक दोन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या कर्नाटकात काँग्रेसचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आपल्या राज्यासाठी स्वतंत्र झेंडयाच्या डिझाइनला आज मंत्रिमंडळाची मंजुरी दिली. आता हे डिझाइन केंद्र सरकारला पाठवण्यात येणार असल्याने भाजपची चांगलीच गोची झाली आहे. सिद्धरामय्या यांनी हिंदू राष्ट्रवादाविरोधात कन्नड राष्ट्रवादाचे कार्ड खेळून भाजपची कोंडी केल्याचे मानले जात आहे.

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आपल्या कार्यालयात विविध कन्नड संघटनांच्या नेत्यांच्या बैठकीत कर्नाटकसाठीच्या स्वतंत्र झेंडयाचे डिझाइन सर्वांना दाखवले. त्यानंतर कन्नड नेत्यांनी मुख्यमंत्र्यांवर अभिनंदनाचा वर्षावच केला. सिद्धरामय्या यांच्या प्रयत्नांमुळेच आमच्या राज्याला स्वतंत्र ध्वज मिळालाय. कानडी जनतेतर्फे आम्ही मुख्यमंत्र्यांना धन्यवाद देत आहोत, असे एक अग्रणी कन्नड नेते सारा गोविंद यांनी सांगितले.

आजवर कर्नाटकात कन्नड संघटना पिवळया आणि लाल रंगाचे पट्टे असलेल्या ध्वजाचा अनौपचारिकरीत्या वापर करत आल्या आहेत. राज्य सरकारही आपल्या कार्यक्रमांमध्ये त्याच ध्वजाचा वापर करत असे. आपल्या राज्याचा अधिकृत ध्वज असावा, अशी मागणी जनतेतून सतत झाल्यानंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी त्यासाठी एक समिती स्थापन केली होती. कन्नड डेव्हलपमेंट ऍथॉरिटीचे चेअरमन एस. जी. सिद्धरामय्या हे त्या समितीचे अध्यक्ष होते. त्या समितीने तयार केलेले ध्वजाचे डिझाइन त्यांनी मुख्यमंत्र्यांना विधानसभेतील कार्यालयात सादर केले.

भाजप बुचकळयात

विधानसभा निवडणुकीला दोनच महिने उरलेत. कर्नाटकच्या स्वतंत्र झेंडयाबाबत काय भूमिका घ्यावी याविषयी भाजप बुचकळयात पडला आहे. त्या झेंडयाला पाठिंबा दिला तर ‘एक राष्ट्र, एक ध्वज’ या संघाच्या भूमिकेला हरताळ फासला जाणार आहे. तर कर्नाटकच्या झेंडय़ाला विरोध केल्यास त्याचा मोठा फटका निवडणुकीत बसण्याचा धोका निर्माण झालाय.

कन्नड बावटा कसा आहे?

कर्नाटकसाठी तयार करण्यात आलेल्या स्वतंत्र ध्वजामध्ये वरती पिवळी पट्टी आहे. मधली पट्टी पांढऱ्या रंगाची असून त्यावर ‘गंदु भेरूडा’चे म्हणजे दंतकथेतील दोन शिराच्या पक्षाचे चिन्ह आहे. तर खालची पट्टी लाल रंगाची आहे.

कर्नाटकचा ध्वज हा राज्यघटनाविरोधी नाही. अशा ध्वजाला संविधानाची बंदीही नाही. राज्याचा ध्वज हा राष्ट्रध्वजाच्या खाली फडकवावा लागेल. आम्ही ते बंधन पाळणार आहोत. कानडी जनतेची ध्वजाची मागणी खूप जुनी होती. अखेर ‘कन्नड बावटा’ आम्हाला मिळाला याचा आनंद मोठा आहे. केंद्र सरकार त्याला मंजुरी देईल अशी आशा आहे.

  •  सिद्धरामय्या, मुख्यमंत्री, कर्नाटक.

कर्नाटकच्या या झेंडयावर मी काही बोलू इच्छित नाही. आधी झेंडा पाहीन. मग काय ते सांगेन.

  •  जगदीश शेट्टार, भाजप नेते, विधानसभा कर्नाटक.

आजचा दिवस ऐतिहासिक म्हणावा लागेल. कर्नाटकच्या ध्वजाची डिझाइन राज्य सरकारने मंजूर केली. त्या ध्वजाला मंजुरी देण्यात केंद्र सरकारलाही तांत्रिकदृष्टय़ा कोणतीच अडचण असता कामा नये.

  •  प्रा. चंद्रकांत पाटील तथा ‘चंपा’

अध्यक्ष, कर्नाटक साहित्य अकादमी.