कर्नाटकात काँग्रेस आमदारांची हाणामारी; एकजण रुग्णालयात दाखल

1

सामना ऑनलाईन । बंगळुरू

काँग्रेस आमदारांच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीला चार आमदार गैरहजर होते. त्यानंतर आमदार फुटू नयेत, यासाठी त्यांना रेसॉर्टवर हलवण्यात आले होते. त्यानंतर काँग्रेसच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. रेसॉर्टवर रविवारी दोन काँग्रेस आमदारांमध्ये हाणामारी झाली. त्यात जखमी झालेल्या आनंद सिंह या आमदरांना रुग्णालयात हलवण्यात आले आहे. मात्र, आमदारांमध्ये हाणामारी झाल्याच्या घटनेचे काँग्रेसने खंडण केले आहे. अशी कोणतीही घटना घडली नसून विरोधक अपप्रचार करत असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. सिंह यांना प्रकृती अस्वास्थामुळे रुग्णालयात दाखल केल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात आले.

रेसॉर्टमध्ये काँग्रेसचे आमदार आनंद सिंह आणि जे. एन. गणेश यांची बोलाचाली झाली. त्याचे वादात रुपांतर झाले. त्यात ते आमदार एकमेकांना भिडले. त्या हाणामारीत गणेश यांनी आनंद यांच्या डोक्यात बाटली मारली. डोक्याला इजा झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शनिवारी रात्री काँग्रेस आमदारांची पार्टी सुरू होती. त्यादरम्यान या आमदारांची हाणामारी झाली. गणेश हे काँग्रेसमध्ये नाराज असून आणखी एका आमदारासह पक्ष सोडण्याचा त्यांचा विचार सुरू होता. या मुद्द्यावरून गणेश आणि आनंद यांच्यात वादाला सुरूवात झाली. त्यात आनंद यांनी गणेश यांच्यावर आरोप केले. त्यामुळे संतप्त झालेल्या गणेश यांनी आनंद यांच्या डोक्यात बाटली मारली. हे आमदार चांगले मित्र आहेत. त्याच्यात असे वादविवाद होत असतात. हे प्रकरण गंभीर नाही. फक्त त्यांच्यातील वाद वाढला होता, असे काँग्रेसच्या जमीर अहमद यांनी सांगितले.

रुग्णालयाने आनंद यांच्या प्रकृतीबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. काँग्रेसने आमदारांमध्ये हाणामारी झाल्याचे वृत्त फेटाळले आहे. आनंद सिंह यांना छातीत दुखू लागल्याने रुग्णालयात दाखल केल्याचे काँग्रेस नेते डी. के. सुरेश यांनी सांगितले. आमदारांमध्ये हाणामारी झाली नसून आनंद यांना इजा झाली नसल्याचेही त्यांनी सांगितले. त्यांचे आई-वडिल रुग्णालयात असून विरोधक या मुद्द्यावर अपप्रचार करत असल्याचा आरोप त्यांनी केला. या घटनेवरून काँग्रेसमध्ये सर्वकाही आलबोल नसल्याचे स्पष्ट होत असल्याचा आरोप भाजपने केला आहे. काँग्रेसमधील नाराजी उघड झाली असून ती थोपवण्यात काँग्रेसला अपयश आल्याचा आरोपही भाजपने केला आहे. काँग्रेसने भाजपवर आमदारांच्या पळवापळवीचा आरोप करण्याआधी पक्षातील नाराजी दूर करावी असा सल्लाही भाजपने काँग्रेसला दिला आहे.