कर नाटक! विधानसभा तिकीट वाटपावेळी कार्यकर्त्यांचा गोंधळ

सामना ऑनलाईन । बंगळुरू

कर्नाटक विधानसभा निवडणुकांसाठी काँग्रेसने रविवारी आपली पहिली यादी जाहीर केली. या यादीत २१८ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. परंतु या तिकीट वाटपावरून असंतुष्ट कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी गोंधळ घातला. त्यामुळे पक्षांतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे. अनेक काँग्रेस नेत्यांनी तिकीट न मिळाल्यामुळे नाराज होऊन खासदार आणि माजी रेल्वे मंत्री मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी आंदोलन करण्यात आले आहे. तसेच तिकीट न मिळाल्यामुळे पक्षाचे नेते अंजनामूर्ती यांच्या समर्थकांनीही नाराजी व्यक्त केली. नेलमंगा येथे नाराज कार्यकर्त्यांनी टायर जाळून विरोध दर्शवला. याशिवाय तिकिटाचे दावेदार असलेले बृजेश कलप्पा यांनी ट्विटरवरून आपली नाराजी व्यक्त केली आहे. सर्व नेत्यांनी मुख्यमंत्री सिद्धरमैया यांच्या विरोधात जोरदार प्रदर्शने सुरू केली आहेत. अनेक नाराज नेत्यांनी आपला राजीनामा देण्याचीही तयारी दर्शविली आहे.

कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष वी. आर. सुदर्शनसुद्धा तिकीट न मिळाल्यामुळे नाराज असल्याचे सांगण्यात येत असून ते काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश करू शकतात असे सांगण्यात येत आहे. बंगळुरू शहराचे माजी आमदार प्रसन्ना कुमार यांनीही तिकीट न मिळाल्याचा राग आवळून जेडीएसमध्ये प्रवेश करण्याची चर्चा आहे. याशिवाय काँग्रेसने पीएनबी घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सीच्या वकिलांना तिकीट दिले असून पक्षातील नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी पक्षाच्या या निर्णयाला विरोध केला आहे.

काँग्रेसने जाहीर केलेल्या पहिल्या यादीनुसार मुख्यमंत्री सिद्धरमैया हे चामुंडेश्वरीमधूनच निवडणूक लढवणार आहेत. याशिवाय मुख्यमंत्र्याचा मुलगा यतीन्द्र यालाही पक्षाने तिकीट दिले असून तो वरूणा विधानसभेतून निवडणूक लढवणार आहे. यादरम्यान, ‘एआयएमआयएम’ने कर्नाटक निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. एआयएमआयएम जेडीएसला पाठिंबा देणार असून जेडीएस आणि बसपा यांच्या आधीपासूनच युती झालेली आहे.