तलावात एचआयव्हीग्रस्त महिलेचा मृतदेह आढळला, ग्रामस्थांचा पाणी पिण्यास नकार

सामना ऑनलाईन । हुबळी

कर्नाटकमधील हुबळी येथे एका एचआयव्ही ग्रस्त महिलेने आजारपणाला कंटाळून तलावात उडी मारून आत्महत्या केली. यामुळे तलावातील पाणी पिल्यास आपल्यालाही एड्स होईल या भीतीने ग्रामस्थांनी तलावचं रिकामा केल्याची अचंबित करणारी घटना घडली आहे.

उत्तर कर्नाटकमधील नावलगुंड तालुक्यात हा मोराब नावाचा तलाव आहे. संपूर्ण गावाला याच तलावातून पाणी पुरवठा करण्यात येतो. 29 नोव्हेंबरला तलावात एका महिलेचा सडलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला. ही बातमी वाऱ्यासारखी गावात पसरताच सर्वत्र एकच खळबळ उडाली. कारण ती महिला गावातीलच होती व एचआयव्हीने ग्रस्त होती. तिच्या शरीरातील विषाणू पाण्यात मिसळल्याने ते पाणी पिल्यास आपल्यालाही एड्स होईल, अशी भीती ग्रामस्थांना वाटू लागली. यामुळे गावकऱ्यांनी तलावाचे पाणी पिणेच सोडून दिले. याबद्दल जिल्हा प्रशासनाला कळताच वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राजेंद्र डोड्डामणी यांनी एड्सचा प्रसार पाण्यातून होत नाही, असे ग्रामस्थांना समजवून सांगितले. पण ग्रामस्थ काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. यामुळे नाईलाजाने जिल्हा प्रशासनाने स्थानिकांच्या मदतीने भरलेला 20 तलाव पंपाच्या मदतीने रिकामा केला. त्यानंतर त्यात दुसरे पाणी भरण्यात आले. दरम्यान जर त्या एचआयव्ही ग्रस्त महिलेच्या जागी दुसरी कोणी सामान्य व्यक्ती असती तर ग्रामस्थांनी तलावातील पाणी वापरण्यास नकार दिला नसता, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. तसेच एड्सबद्दल अजूनही लोकांमध्ये अनेक गैरसमज आहेत. त्यामुळे या आजाराबद्दल जनजागृती करणे गरजेचे असल्याचे डॉक्टर डोड्डामणी यांनी म्हटले आहे.