करणी सेना पाहणार ‘पद्मावत’; भन्साळींचं निमंत्रण स्वीकारलं

2

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

‘पद्मावत’ सिनेमाला कडाडून विरोध करणाऱ्या करणी सेनेने प्रदर्शनापूर्वी सिनेमा पाहण्यास तयारी दर्शविली आहे. करणी सेनेचे अध्यक्ष लोकेंद्र सिंह कालवी यांनी आम्ही सिनेमा पाहण्यास तयार असल्याचं चिठ्ठीद्वारे संजय लीला भन्साळीं यांना कळवलं आहे. सेन्सॉर बोर्ड आणि सर्वोच्च न्यायालयाने मार्ग मोकळा केल्यानंतरही करणी सेनेचा विरोध मावळला नव्हता. त्यामुळे भन्साळींनी श्री राजपूत करणी सेना आणि श्री राजपूत सभा यांना प्रदर्शनापूर्वी चित्रपट पाहण्याचे निमंत्रण दिलं होतं.

सिनेमा आधी बघा आणि मग निर्णय घ्या, अशी विनंती भन्साळी यांनी करणी सेनेला केली होती. तसेच राणी पद्मावती आणि अलाउद्दीन खिल्जी यांच्यावर कोणताही प्रेमप्रसंग चित्रीत करण्यात आला नसल्याचा उल्लेख भन्साळींच्या चिठ्ठीत होता. इतिहासाची मोडतोड करून चित्रपटनिर्मिती केल्याचा आरोप करणी सेनेने सुरुवातीपासूनच केला आहे. त्यामुळे चित्रपट पाहिल्यानंतर करणी सेना योग्य निर्णय घेईल अशी अपेक्षा भन्साळी यांना आहे. ‘पद्मावत’ सिनेमा येत्या २५ जानेवारीला देशभरात प्रदर्शित होणार आहे.