राजस्थान : भाजपच्या पराभवावर करनी सेनेचा जल्लोष


सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

राजस्थानमधील अजमेर आणि अलवर लोकसभा व मांगलगड येथील विधानसभेच्या जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पार्टीचा दणदणीत पराभव झाला आहे. याआधी या तिन्ही जागांवर भाजपचे उमेदवार होते, मात्र त्यांच्या निधनानंतर या जागा रिक्त झाल्या होत्या. तिन्ही जागांवर काँग्रेसच्या उमेदवाराने भाजप उमेदवाराचा पराभव केला. भाजपच्या पराभवाचा जल्लोष करनी सेनेने फटाके वाजवत साजरा केला.

राजस्थानमध्ये भाजपला स्वीकाराव्या लागलेल्या पराभवावर बोलताना करनी सेना म्हणाली की, ‘हा एका पक्षाचा विजय नाही, तर आमच्या संघर्ष समितीचा विजय आहे. राज्यातील नागरिकांनी आमच्या संघर्षाचे समर्थन केले आहे आणि भाजपविरोधात मतदान केले. जर भाजप पुन्हा पुन्हा तेच अनुकरण करत राहिली तर त्याचा परिणाम त्यांना अशाच पद्धतीने भोगावा लागले.’

राजस्थान, पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या विजयसंकल्पाला सुरुंग

करनी सेनेचे प्रमुख लोकेंद्र कालवी यांनी म्हटले की, ‘भाजपने आपल्याच जागा गमावल्या कारण त्यांनी ‘पद्मावत’ या इतिहासाची तोडफोड करणाऱ्या चित्रपटावर बंदी घातली नाही. संजय लिला भन्साळी यांच्या चित्रपटावर नाराजी व्यक्त करत २९ तारखेला लोकांनी मतदान केले आणि त्याचा परिणाम आज आपल्यासमोर आले, असेही ते कालवी म्हणाले. तसेच पुढील निवडणुकांमध्ये विजय मिळवण्यासाठी मोदींनी चित्रपटावर बंदी घालावी अशी मागणी कालवी यांनी केली.