JEE Advanced 2019 परीक्षेत चंद्रपूरचा कार्तिकेय गुप्ता देशात पहिला

3

सामना ऑनलाईन । नागपूर

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी रुडीकीने घेतलेल्या जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेत चंद्रपूरच्या बल्लारपूर येथे राहणारा कार्तिकेय गुप्ता देशात पहिला आला आहे. त्याला 100 पर्सेंटाइल मिळाले आहेत. या आधीही जेईई मेन परीक्षेत 100 गुण मिळवून तो देशात 18 वा तर महाराष्ट्रात दुसरा आला होता. कार्तिकेयने यावर्षीच इयत्ता बारावी परीक्षेत 93.7 टक्के गुण मिळविले आहेत.

कार्तिकेयने जेईई अॅडव्हान्स परीक्षेत 360 पैकी 337 गुण मिळविले आहेत. कार्तिकेयचे वडील चंद्रेश गुप्ता बल्लारपूर पेपरमिलमध्ये मॅनेजर असून आई पूनम गुप्ता या गृहिणी आहेत. जेईई अॅडव्हान्स परीक्षा 27 मे रोजी झाली होती. देशभरातून 2.45 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. जेईई अॅडव्हान्स परीक्षेचा निकाल लागल्यानंतर कार्तिकेयने आनंद व्यक्त केला. निकाल चांगला लागेल हे माहिती होते. पण देशातून पहिला येईल असे वाटले नव्हते, असे कार्तिकेयने माध्यम प्रतिनिधींशी बोलताना सांगितले. परीक्षेची कसून तयारी केली आणि नियमित क्लासला जाण्याबरोबरच 6 ते 7 तासांचं वेळापत्रक तयार करून अभ्यास केल्यानेच हे यश मिळाल्याचं कार्तिकेयनं सांगितलं आहे.