कश्मीर प्रश्न सोडवायचा असेल तर कलम ३७० हटवा- अनुपम खेर

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी कश्मीर प्रश्न सोडवायचा असेल तर त्यासाठी कलम ३७० हटवलं जाणं गरजेचं आहे, असं म्हटलं आहे. इंडिया आसियान यूथ समिटमध्ये सहभागी झाल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते.

आपल्या मताला अधिक स्पष्ट करताना खेर म्हणाले की, कश्मीरमध्ये कलम ३७० असल्यामुळे देशाच्या अन्य प्रदेशातील नागरिक कश्मीरमध्ये कायम वास्तव्य करू शकत नाहीत. याशिवाय तिथे संपत्तीची खरेदी करणे, शिक्षण संस्था चालवणे हे अधिकार कश्मिरी नागरिकाखेरीज कोणालाही दिले जात नाहीत. त्यामुळे कश्मीरमध्ये अन्य राज्यांसारख्या सोयीसुविधा पोहोचल्या पाहिजेत. तसं झालं तर कश्मीर विकसित होईल. त्यांनाही इतर राज्यांसारखी विकासाची समान संधी उपलब्ध झाली पाहिजे. म्हणून कलम ३७० हटवलं जाणं गरजेचं आहे.

फुटीरतावाद्यांचा उल्लेख न करता खेर यांनी त्यांच्या धोरणांचा समाचार घेतला. ते म्हणाले की, काही मोजके जण कश्मिरी जनतेला काय हवंय, ते ठरवू शकत नाहीत. इथे राहणारे सगळे आपलेच भाऊ-बहीण आहेत. त्यामुळे कश्मिरींना विकासाच्या दिशेने नेण्यासाठी ३७० हटवायला हवं, असंही खेर यावेळी म्हणाले.