नृत्य हीच माझी पूजा आणि श्रीकृष्ण माझा सहारा, चैतन्य, ऊर्जा!

>>शमा भाटे, कथ्थक नृत्यांगना

आपलं आवडतं दैवत ?

श्रीकृष्ण

त्याचं कौतुक कशा पद्धतीने करायला आवडतं?

सगळ्याच कला कृष्णाशी जोडलेल्या आहेत. त्यामुळे सुंदरता, सकारात्मकता त्याच्याशी जोडलेली आहे. तो तत्त्ववेत्ता, खटय़ाळ मुलगा, गोपिंचं प्रियराधन करणारा, पूर्ण पुरुष आहे. सर्व तऱहेच गुण त्याच्या व्यक्तिमत्त्वात सामावलेले आहेत.

संकटात तो तुम्हाला कशी मदत करतो, असं वाटतं ?

संकटात कृष्ण मदत करतो, यापेक्षा त्याचं चैतन्य, ऊर्जा हाच आपल्यासाठी सहारा. तेच कायम बरोबर असतं, असं वाटतं.

कला आणि भक्तीची सांगड कशी घालता ?

कला म्हणजे माझं नृत्य सादरीकरण. जे सात दिवस त्याच्या कलेत मी मग्न असते त्या दिवसांत माझी कलासाधना ही भक्तीच आहे. त्याला कृष्ण, शीव, मूर्त, अमूर्त कोणतही नाव द्यावं. कारण आपल्याकडे दोन्ही प्रकारची भक्ति मानली जाते. त्यामुळे कला आणि भक्ती एकमेकांशी निगडीतच आहे. कलाकार एक सामान्य माणूस, व्यावसायिक, व्यवहार सांभाळणारा संसारीही असतो. पण जेव्हा तो कलेच्या मार्गावर असतो तेव्हा तो भक्तीच्याच मार्गावर असतो. कारण त्यावेळी दोष समोर न येता आतली निर्मळता बाहेर येते.

तुमच्यातली कला साकारण्याकरिता श्रीकृष्णाची कशी मदत होते

कथ्थक नृत्यात आम्ही वर्षानुवर्ष त्याचं गुणगान करत असतो. फक्त त्याचंच नाही तर त्याच्या बासरी, लोणी खाण्याचं, छेडछाडीचं, संकटातून सोडवलं म्हणून त्याच्या वीरत्वाचं, पर्यावरणाचा ऱहास होऊ नये म्हणून त्याने कालियाला मारलं तेव्हापासून त्याच्यात असलेला तत्त्ववेत्तेपणा. याचं मला खूप आकर्षण वाटतं.

श्रीकृष्णाला प्रार्थना केल्यावर यश मिळालंय, असा प्रसंग?- मी खूप भाविक नाही. तरही ‘कृष्ण द लिब्रेटर’ या माझ्या कलाकृतीचे बावीसपेक्षा जास्त प्रयोग झाले. कथ्थकच्या एखाद्या कलाकृतीचे एवढे प्रयोग क्वचितच होतात. हे सुद्धा जगभरात कृष्ण किती ठसलेला आहे, याचं प्रतिक आहे.

त्याच्यावर रागावता का ?

अजिबातच नाही. स्वतःवर रागावते.

तो तुमचे लाड कसे पुरवतो ?

त्याला मी व्यक्तिऐवजी चेतना, ऊर्जा, सकारात्मकतेचं प्रतीक या दृष्टीने बघते. नृत्यात दाखवत असले तरीही माझ्या मनात तो गुरु, संकटात वाचवणारी शक्ती, मार्ग दाखवणारा पथदर्शक अशा भावनेने मी त्याच्याकडे पाहते. संकटाला तोंड देण्याची प्रतिकारशक्ती मला त्याच्याकडूनच मिळते, असं वाटतं.

त्याचं कोणते स्वरूप आवडते?

एकाच रुपाऐवजी मला त्याचं पूर्णपुरुषत्व अधिक भावतं.

त्याच्यापाशी काय मागता ?

आयुष्यात मी जसजशी पुढे जाईन तसतसं मला चांगलं माणूस बनव.

त्याची नियमित उपासना कशी करता ?

माझं नृत्य हाच माझा पूजापाठ. दर महिन्याला कृष्णाची रचना तयार करते आणि शिकवते. त्याच्यातच आमची प्रगती होते असं वाटतं.