कठुआतील घटनेची पिंपरीत पुनरावृत्ती, मंदिरात ८ वर्षांच्या मुलीवर बलात्कार

विनोद पवार, पिंपरी

जम्मू-कश्मीरातील कठुआ भागामध्ये चिमुरडीवर बलात्कार करून तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. या घटनेची पुनरावृत्ती पिंपरीमध्ये घडली आहे. खराळवाडी भागामध्ये एका आठ वर्षांच्या मुलीवर मंदिरातच बलात्कार करण्यात आला आहे. सुदैवाने या मुलीच्या जीवाचे काही बरेवाईट करण्यात आले नाही.

रोहन दिलीप भांडेकर (वय १९, रा. खराळवाडी, पिंपरी) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव असून त्याने या छोट्या मुलीला खराळवाडी भागात असलेल्या भगवतगीता मंदिरात नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. आहे. पिडीत मुलगी शनिवारी (दि. ९) सकाळी अकराच्या सुमारास मंदिरात खेळण्यासाठी गेली होती. मुलगी खेळत असताना आरोपीने तिच्यासोबत कोणी नाही हे पाहून रोहनने तिच्यावर अत्याचार केले. या छोट्या मुलीने तिच्यासोबत घडलेला प्रकार घरी जाऊन आईला सांगितला. आईने त्वरीत पिंपरी पोलीस ठाण्यात धाव घेतली. या कृत्यानंतर आरोपी भांडेकर पसार झाला होता. पिंपरी पोलिसांनी त्याचा शोध घेऊन अटक केली. त्याला मोरवाडी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १५ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. सहायक पोलीस निरीक्षक गजानन कडाळे तपास करत आहेत.

एक प्रतिक्रिया