केदार तंदुरुस्त चाचणीत पास, ‘टीम इंडिया’सह वर्ल्ड कपच्या स्वारीवर जाणार

21

सामना प्रतिनिधी । मुंबई

विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला रवाना होण्यापूर्वी ‘टीम इंडिया’ला मोठा दिलासा देणारी बातमी शनिवारी आली. अष्टपैलू क्रिकेटपटू केदार जाधव तंदुरुस्त चाचणीत पास झाल्याची माहिती हिंदुस्थान क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) दिली. त्यामुळे मधल्या फळीतील महत्त्वाचा फलंदाज असलेला केदार जाधव 22 मे रोजी ‘टीम इंडिया’सह वर्ल्ड कपच्या स्वारीवर जाणार हे आता पक्के झाले आहे.

‘टीम इंडिया’चे फिजिओ पॅट्रिक फरहार्ट हे मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये 34 वर्षीय केदार जाधवच्या तंदुरुस्तीवर मेहनत घेत होते. त्यांनीच केदार तंदुरुस्त असल्याचा अहवाल बीसीसीआयला सुपूर्द केला. केदारला तंदुरुस्त करण्यासाठी फरहार्ट ऑस्ट्रेलियाहून लवकर परतले आणि त्यांनी या महत्त्वाच्या खेळाडूला लवकरात लवकर बरेही केले. केदारची इंग्लंडवारी पक्की झाल्याने ‘टीम इंडिया’च्या मधल्या फळीतील चिंता आता मिटली आहे. हिंदुस्थानी संघ 22 मे रोजी इंग्लंडच्या स्वारीवर रवाना होणार असून 5 जूनला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आपल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अभियानास प्रारंभ करील.

आयपीएलमध्ये झाली होती दुखापत
चेन्नई सुपरकिंग्ज संघाकडून खेळणाऱया केदार जाधवला किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्धच्या सामन्यात डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण करताना खांद्याला दुखापत झाली होती. निकोलस पुरणने टोलावलेला चेंडू अडकण्यासाठी केदारने डाइव्ह मारली. केदारने चेंडू अडवला, परंतु खांदा दुखावल्याने तो मैदानावर तसाच उभा राहिला. त्यानंतर जाधवने मैदान सोडले. संपूर्ण सामन्यात जाधव नंतर क्षेत्ररक्षणाला आलाच नाही. या दुखापतीमुळे तो उर्वरित आयपीएल स्पर्धेसही मुकला होता.

आपली प्रतिक्रिया द्या