शिवसैनिक दुहेरी हत्याकांड: आरोपपत्रात माजी महापौर आणि उपमहापौरांचे नाव

shiv sena-kedgaon

सामना प्रतिनिधी । नगर

नगर केडगाव येथील दुहेरी हत्याकांड प्रकरणांमध्ये माजी उपमहापौर सुवर्ण कोतकर तसेच त्यांचा पती माजी महापौर संदीप कोतकर यांचा गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याचे सीआयडी तपासामध्ये उघड झाले असून न्यायालयामध्ये दाखल केलेल्या आरोपपत्रामध्ये स्पष्ट केले आहे. केडगाव हत्याकांड तीन महिने पूर्ण होताना सीआयडीने येथील जिल्हा न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते.

तीन महिने पूर्ण झाले आहेत केडगाव येथे शिवसेनेचे माजी शहर उपप्रमुख संजय कोतकर वसंत ठुबे यांची हत्या करण्यात आली होती. सुरुवातीला याचा तपास पोलिसांनी केला होता त्यानंतर ठुबे व कोतकर कुटुंबांनी या घटनेचा तपास सीबीआयतर्फे करावा, अशी मागणी केली होती नंतर हा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आला होता. सीआयडीने वेगळे पथक नेमून याचा तपास सुरू केला होता. न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात माजी उपमहापौर सुवर्णा कोतकर यांच्या नावाचा समावेश आहे. आरोपींचा एकमेकांना कॉल करण्याचा क्रम आणि तांत्रिक माहिती यामध्ये देण्यात आली आहे. आरोपी भानुदास कोतकर, औदुंबर कोतकर, विशाल कोतकर, सुवर्णा कोतकर घटनेच्या दिवशी एकाच ठिकाणी होते. सुवर्णा कोतकर यांनी भानुदास व संदीप कोतकर यांच्याशी फोनवर बोलणे केल्याची माहिती तपासात आहे.

भानुदास कोतकर व संदीप कोतकर यांना आधी खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. त्यातील भानुदास कोतकर जामीनावर बाहेर आला होता. तर संदीप कोतकर यास नाशिक कारागृहातून धुळे येथील शासकीय रुग्णालयांमध्ये नेत असताना त्याच्याशी सुवर्णा कोतकर यांनी संपर्क साधला असल्याचे तपासात उघड झाले आहे.