दारूला ‘महाराणी’ बनवा, खप वाढवा! गिरीश महाजन यांचा सल्ला

सामना ऑनलाईन, शहादा

तुमच्या कारखान्यात तयार होणाऱया दारूला ‘महाराणी’ नाव द्या, मग बघा खप कसा पटकन वाढेल, असा सल्ला जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी सातपुडा साखर कारखान्याच्या संचालकांना दिला. दारूच्या ब्रॅण्डला महिलांचे नाव दिले की त्याचा खप वाढतो हे लक्षात ठेवा असे सांगायलाही महाजन विसरले नाहीत. महाजनांना त्यांचे हे वक्तव्य चांगलेच महागात पडले आहे. चंद्रपुरातील ‘श्रमिक एल्गार’ या संघटनेने मूल पोलीस स्थानकात महाजनांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे तर नाशकात राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी महाजनांच्या पुतळय़ाला जोडे मारले.

राज्यात सर्वाधिक देशी दारूची विक्री कोपरगावच्या शंकरराव काळे यांच्या कारखान्याची होते. त्यांच्या कारखान्यातील दारूचे नाव ‘मिंगरी’ आहे, तर माजी आमदार शंकरराव कोल्हे यांच्या कारखान्यातील दारूचे नाव ‘ज्युली’ आहे. सातपुडा कारखान्याने दारूचे नाव ‘महाराणी’ ठेवावे असा सल्ला गिरीश महाजनांनी दिला

सातपुडा साखर कारखान्याच्या गाळप हंगामास शनिवारी सुरुवात  झाली. यावेळी महाजन यांच्यासह पर्यटनमंत्री जयकुमार रावल हे सुद्धा उपस्थित होते. यावेळी कारखान्याची माहिती देताना अध्यक्ष दीपक पाटील यांनी आमच्या कारखान्याचा डिस्टिलरी प्रकल्प आहे, पण मद्याची विक्री मात्र कमी होते असे म्हटले.

तोच धागा पकडून महाजन यांनी देशी दारू विक्रीचे गणित सोपे करून सांगितले. ते म्हणाले, बाजारात ज्या उत्पादनांना महिलांचे नाव दिले आहे त्यांची विक्री अधिक होते. जास्त विक्री असलेल्या गुटख्यांची नावे विमल व केसर आहेत. म्हणूनच सातपुडा कारखान्यानेही दारूला महिलेचे नाव द्यावे.