देव तारी त्याला… दोनशे फूट दरीत कोसळूनही चिमुकले सुरक्षित

सामना प्रतिनिधी, कसारा

कारवरील नियंत्रण सुटल्याने ती कार कसारा घाटातील दोनशे फूट दरीत कोसळून अपघात झाला. मात्र या कारमधून प्रवास करणाऱ्या एका तीन वर्षांच्या मुलीला आणि काही महिन्यांच्या तान्हुल्याला साधे खरचटलेही नाही. ‘देव तारी त्याला कोण मारी’ या म्हणीचा प्रत्यय आज कसारावासीयांना आला.

accident-2

ठाणे येथील दीपक अमृतकर हे आपल्या कुटुंबीयांसमवेत आपल्या नाशिक येथील अंबड या गावी आज पहाटे निघाले होते. त्यांची कार कसारा घाटात आली असता दीपक यांचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि कार संरक्षक कठड्याला धडकून दोनशे फूट खोल दरीत कोसळली. कार कोसळल्याचा आवाज ऐकून परिसरातील ग्रामस्थ मदतीसाठी दरीत धावले. एवढ्या उंचावरून कोसळल्याने गाडीचा साफ चक्काचूर झाला होता. गाडीतील अमृतकर कुटुंबांपैकी केवळ दीपक आणि त्यांची पत्नीच जखमी झाले. आश्चर्य म्हणजे एवढ्या मोठ्या अपघातात त्यांच्या दोन चिमुकल्यांना साधे खरचटलेही नाही.