पाऊस कमी झाला; आता केरळला धोका साथीच्या आजारांचा

सामना ऑनलाईन । थिरुवनंतपुरम

केरळमधील पाऊस कमी झाल्यामुळे पुराचे पाणी ओसरू लागले आहे, महापुराने घातलेले थैमान आता थांबले आहे. पुढच्या दोन ते दिवसांत पावसाचा जोर पूर्णपणे कमी होईल, असे हवामान विभागाने जाहीर केले आहे. त्यामुळे केरळातील 11 जिल्ह्यांतला  ‘रेड ऍलर्टसरकारने मागे घेतला आहे; परंतु सर्वत्र दलदल आणि अशुद्ध पाण्याचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळेच साथीच्या आजारांचे थैमान सुरू होण्याची भीती केरळच्या आरोग्य खात्याने व्यक्त केली आहे. अशुद्ध पाणी आणि खराब हवेमुळे पसरणाऱया आजारांवर नियंत्रण ठेवणे सरकारी पथकांपुढचे मोठे आव्हान ठरणार आहे.

3.5 लाख नागरिक बेघर

प्रलयकारी पाऊस आणि पुराने राज्यात आतापर्यंत 357 जणांचा बळी घेतला असून सुमारे 21 हजार कोटींहून अधिक किमतीच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे. सरकारी बचाव शिबिरात 20 लाख नागरिकांनी आश्रय घेतला असून पुराचे पाणी कमी झाल्यावर आता केरळमध्ये साथींच्या आजारांचा प्रसार होण्याची भीती वाढली आहे. लष्कर, नौदल, तटरक्षक दल, हवाई दल आणि एनडीआरएफच्या जवानांनी भीषण पुरातून मोठय़ा धाडसाने हजारो नागरिकांची सुटका केली आहे. पुरामुळे राज्यातील 3.5 लाख नागरिक बेघर झाले आहेत.

उलट्या, जुलाब, व्हायरल फिव्हर

उलट्या, जुलाब, व्हायरल फिव्हर आणि अन्य साथीच्या आजारांनी आपले हातपाय पसरायला सुरुवात केल्याचे आपत्ती व्यवस्थापन विभाग सांभाळणाऱया अनिल वासुदेवन  यांनी सांगितिले. कांजण्यांच्या दोन रुग्णांना बचाव शिबिरातून हलवून अन्यत्र ठेवण्यात आले आहे. सरकारी आणि लष्कराची वैद्यकीय पथके पुरानंतरच्या आजारांशी मुकाबला करायला सज्ज ठेवण्यात आली आहेत. फूड पॅकेटस्, औषधे आणि अन्य बचाव सामुग्री बचाव शिबिरांत पोहचविण्यासाठी 67 हेलिकॉप्टर्स, 24 विमाने आणि 548 मोटार बोटी सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. केरळच्या पूरग्रस्तांसाठी मध्य प्रदेश व चंदिगड या राज्यांनी प्रत्येकी 10-10 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.

  • केरळावर कोसळलेल्या अस्मानी आपत्तीतून केरळवासीयांना दिलासा देण्यासाठी केंद्र, राज्य सरकारांसोबत देशातील सामान्य नागरिकही पुढे येत आहेत.
  • एनडीआरएफ, लष्कर, नौदल आणि तटरक्षक दलाच्या जवानांकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. केरळमध्ये एनडीआरएफच्या जवळपास 169 टीम काम करीत आहेत.
  • 22 हेलिकॉप्टर, नेव्हीच्या 40 बोटी, तटरक्षक दलाच्या 35 बोटींच्या सहाय्याने ही बचाव मोहीम सुरू आहे. याशिवाय स्थानिक तरुण, पोलीस आणि मच्छीमारांचीही मदत मिळत आहे.

केरळच्या महाप्रलयाने केलेले नुकसान

  • आतापर्यंत 3.55 लाख नागरिक बेघर.
  • पूरग्रस्तांना 3026 बचाव शिबिरात आश्रय.
  • राज्यातील 40 हजार एकरावरील शेती पार नष्ट.
  • 134 पूल आणि 96 हजार कि.मी. लांबीचे रस्ते संपूर्ण उद्ध्वस्त.
  • लष्कराच्या 16, नौदलाच्या 28 आणि एनडीआरएफच्या 58 टीम बचावकार्यात.
  • 26 हजारांहून अधिक घरे उद्ध्वस्त.

मुंबई तटरक्षक दलाची स्तुत्य ‘ऑपरेशन वॉटर बेबी’ मोहीम

केरळच्या इडुक्की शहरात मुंबई तटरक्षक दलाच्या नेतृत्वाखाली पुरात सापडलेल्या हजारो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. पण इडुक्की धरणाजवळ तटरक्षक दलाने यशस्वी केलेली ‘ऑपरेशन वॉटर बेबी’ मोहीम सर्वांच्याच कायम स्मरणात राहणारी ठरली. साताऱयाचे लेफ्टनंट कर्नल शशिकांत वाघमोडे यांच्या नेतृत्वाखालील तटरक्षक दलाच्या पथकातील 16 जवानांनी टेकडय़ा आणि पर्वतांनी व्यापलेल्या इडुक्कीत तुफानी जलप्रवाह, दरडी कोसळल्यामुळे पडलेला माती-दगडांची रास आणि प्रचंड दलदलीतून एका गर्भवती महिलेला कुटुंबासह वाचवले आणि त्या महिलेची सुरक्षित प्रसूतीही पार पडण्यास मदत केली. लेफ्टनंट कर्नल वाघमोडे आणि त्यांच्या सहकाऱयांनी 16 ऑगस्टला पाण्याच्या प्रवाहाविरुद्ध बंद पडलेली मोटार बोट अक्षरशः दोन कि.मी. अंतर ढकलत नेली आणि अडकलेल्या गर्भवतीला बोटीतून सुरक्षित स्थळी नेले. जवानांच्या या धाडसी कृतीने प्रभावित झालेल्या त्या महिलेले आपल्या नवजात बालकाला भविष्यात लष्करात पाठवण्याचे वचन आपल्याला दिल्याचे लेफ्ट. कर्नल वाघमोडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.