‘या’ राज्यात १०५ वर्षांपूर्वीच मंजूर झाली मासिक पाळीची रजा

सामना ऑनलाईन । तिरुवनंतपुरम

मासिक पाळीची रजा द्यावी की देऊ नये यावर देशभरात चर्चा सुरू आहे. पण, केरळमधील एका शाळेने आपल्या विद्यार्थिनींसाठी १०५ वर्षांपूर्वीच ही रजा मंजूर केल्याचं समोर आलं आहे. केरळच्या साहित्य अकादमीद्वारे प्रकाशित करण्यात आलेल्या एका पुस्तकात या रजेबाबतचा उल्लेख आहे.

इतिहासकार पी. भास्करानुन्नी यांनी लिहिलेलं केरला इन द नाइन्टिन्थ सेंचुरी नावाचं पुस्तक १९८८ साली प्रकाशित करण्यात आलं. त्यात १९व्या आणि २०व्या शतकातील केरळी संस्कृती, समाजजीवन, जाती-परंपरा, शिक्षण आणि प्रशासनासंबंधी नोंदी करण्यात आल्या आहेत. या पुस्तकात मासिक धर्मानिमित्त विद्यार्थिनींना रजा दिल्याचा उल्लेख आहे. सध्याचा ऐर्नाकुलम हा जिल्हा पूर्वी कोचीन राजवाडा म्हणून ओळखला जात असे. येथील त्रिपुनिथुराच्या सरकारी बालिका विद्यालयाच्या विद्यार्थिनींना १९१२मध्ये वार्षिक परीक्षेच्या दरम्यान मासिक पाळीची रजा देण्यात आली होती. शाळेच्या मुख्याध्यापकांना सर्व संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून हा निर्णय घेतला होता.

तत्कालीन शाळेच्या नियमांनुसार शाळेत वर्षातून ३०० दिवस उपस्थिती असणं अनिवार्य होतं. मात्र, ही शाळा विद्यार्थिनींसाठीच असल्यामुळे मासिक पाळीच्या दरम्यान विद्यार्थिनी आणि शिक्षिकांची मोठ्या प्रमाणावर अनुपस्थिती होत असे. परीक्षेच्या वेळाही नियमित असल्यामुळे ऐन परीक्षेच्या वेळी मुली किंवा शिक्षिका गैरहजर राहत. अशी गैरहजेरी टळावी, म्हणून त्यांना मासिक पाळीत सूट देण्याचा निर्णय १९ जानेवारी १९१२ रोजी घेण्यात आला. तसंच पाळीची रजा घेतल्यानंतर परीक्षा देण्याची अनुमती देण्यात आली होती, असा उल्लेख सदर पुस्तकात करण्यात आला आहे.